Home Maharashtra शासनाच्या अनुदानित बियाण्यांच्या प्रतीक्षेत शेतकरी…. — पेरणीपूर्वी तातडीने वितरणाची मागणी..

शासनाच्या अनुदानित बियाण्यांच्या प्रतीक्षेत शेतकरी…. — पेरणीपूर्वी तातडीने वितरणाची मागणी..

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

शंकरपूर/चिमूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी शासनामार्फत अनुदानित दरात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या बियाण्यांच्या प्रतीक्षेत शेतकरी असून,मृग नक्षत्राच्या पावसाला सुरुवात होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना अद्याप अनेक शेतकऱ्यांना बियाणे प्राप्त झालेले नाहीत.त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

       शेतकऱ्यांनी शासनाच्या सूचनेनुसार महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरून सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे. 

      अनेक लाभार्थ्यांची निवडही झालेली असून आवश्यक कागदपत्रे व रक्कम जमा करण्याची प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे.मात्र प्रत्यक्षात बियाण्यांचे वितरण सुरू न झाल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.

       चिमूर तालुक्यासह ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी खरीप हंगामासाठी धान,सोयाबीन,तूर,मूग,उडीद तसेच इतर पिकांच्या लागवडीची तयारी करत आहेत.

       पेरणीचा कालावधी जवळ आल्याने शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे.बियाणे वितरणात विलंब झाल्यास पेरणी उशिरा होऊन उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

       वाढते उत्पादन खर्च,हवामानातील अनिश्चितता आणि शेतीसमोरील विविध अडचणींमुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.अशा परिस्थितीत शासनाकडून मंजूर झालेली बियाणे वेळेवर मिळणे गरजेचे आहे. 

       संबंधित विभागाने तातडीने वितरण प्रक्रिया सुरू करून शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून द्यावीत,अशी मागणी होत आहे.

     शंकरपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच अशोक चौधरी यांनी शासन व कृषी विभागाकडे लक्ष वेधत सांगितले की, “मृग नक्षत्राच्या पावसाला सुरुवात होण्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या हातात बियाणे पोहोचणे आवश्यक आहे. 

      शेतकऱ्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही बियाणे मिळत नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे.शासनाने तातडीने याबाबत निर्णय घेऊन वितरण प्रक्रिया गतीमान करावी.”शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विभागाने बियाणे वितरणाचे वेळापत्रक जाहीर करून लाभार्थ्यांना तत्काळ बियाणे उपलब्ध करून द्यावीत,अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.