हक्काच्या दर्शनबारीसाठी वारकरी भाविक पुन्हा एकदा वंचित… — आळंदीत पुनः एकदा तात्पुरत्या दर्शनबारीत वारकरी भाविकांची सोय..

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक

आळंदी : महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्र श्रीक्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून अनेक भाविक येत असतात. तसेच कार्तिकी, आषाढी आणि महिन्याच्या एकादशीला आळंदीत यात्रेचे स्वरूप निर्माण होत असते. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या दर्शनासाठी सुसज्ज अशी दर्शनबारीची गरज असताना प्रशासनाने नदीपलीकडील जागेवर दर्शन मंडपाचे आरक्षण टाकले होते.

     स्थानिक प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने अहवाल सादर केल्याने येथील दर्शन मंडपाचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. ऊन, वारा, पाऊस यापासून भाविकांचे संरक्षण व्हावे यासाठी सुस्सज दर्शनमंडपाची नितांत गरज आहे. वारकरी भाविक हक्काच्या दर्शनाबारी साठी यंदाच्या आषाढी पालखी सोहळ्यात सुध्दा वंचित राहणार आहे. पुनः एकदा आळंदी देवस्थानच्या वतीने तात्पुरत्या दर्शनबारीचे नियोजन सुरू केले आहे, पण पावसाळ्यात या दर्शनबारीचे काय हाल होतील हे सांगता येणार नाही, चिखलात पायपीट करुणच दर्शनासाठी भाविकांना जावे लागणार आहे. 

    संत ज्ञानेश्वर महाराज मंदीराशेजारील दर्शनबारी फक्त बाराशे ते पंधराशे भाविकांची मर्यादित असल्याने इतर भाविकांना दर्शनबारीच्या बाहेरच रांग लावावी लागत आहे. तरी भाविकांचा विचार करून दर्शनमंडपाची नितांत गरज आहे. असे आळंदी ग्रामस्थांचे व वारकरी भाविक भक्तांचे म्हणनं आहे. लवकरात लवकर माऊली प्रशासनाला चांगली बुध्दी देऊ दे आणि भाविक भक्तांना सुसज्ज अशी दर्शनबारी उपलब्ध व्हावी अशी माऊली चरणी प्रार्थना.