माती उत्खनन प्रकरणी सावली वनपरिक्षेत्राची धडक कारवाई…

      सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधि 

        सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र व्याहाड नियतक्षेत्र गायडोंगरी मधील वनविभागाचे मालकीचे संरक्षित वन कक्ष क्रमांक 1575 मध्ये उत्खनन करून व्यावसायिक दृष्टीने मातीचे वाहतूक करून विटाभट्टी लावल्या बाबत वनविभागाने कारवाई करून गुन्ह्यात वापरलेले ट्रॅक्टर जप्त केले.

            सविस्तर वृत्त असे की पाथरी उपवनक्षेत्रातील मौजा मेहा येथे वनविभागाद्वारे शामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना अंतर्गत गावकऱ्यांच्या मागणी व गरजेनुसार पिण्याचे पाण्यासाठी सोलर बोरवेल लावण्यात आली होती. सदरच्या सोलर बोरवेलचे संपूर्ण गावकरी पिण्याचे पाण्यासाठी वापर करीत होते. दिनांक 14. 03.2024 रोजी गस्तीदरम्यान सोलर बोरवेल चोरीस गेल्याचे श्री संदीप चूधरी वनरक्षक मेहा यांचे निदर्शनास आले. त्याच दिवशी सदरचे चोरीबाबत पोलीस स्टेशन पाथरी येथे तक्रार नोंदविण्यात आली.

             परंतु चोरांचा थांगपत्ता न लागल्याने वनविभागाने चौकशीचे सूत्र फिरवीत वन्य प्राण्यांचे मागवा घेण्यासाठी लावलेल्या ट्रॅप कॅमेरा द्वारे शोध घेऊन सोलर बोरवेल चोर विलास लालाजी उंदीरवाडे, सदाशिव वारलू मेश्राम व शरद रवींद्र उंदीरवाडे सर्व रा. गायडोंगरी यांना ताब्यात घेऊन दिनांक 02.04.2024 रोजी पोलीस स्टेशन पाथरी यांच्या स्वाधीन केले.

            वनविभागाद्वारे बोरवेल चोर यांची कसून चौकशी केली असता आरोपी विलास लालाजी उंदीरवाडे यांनी नियतक्षेत्र गायडोंगरी येथील वनविभागाचे संरक्षित वन कक्ष क्रमांक 1575 मध्ये अवैधरीत्या माती उत्खनन करून ट्रॅक्टर द्वारे वाहतूक करून बिना परवाना विटाभट्टी सुरू केली असून याबाबत वनविभागाने वन गुन्हा क्र. 09236/230889 दिनांक 02.04.2024 नुसार भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 33 (1) क, ई आणि 35(1) ग अन्वये वन गुणा नोंदविला व दि. 03.04.2024 रोजी आरोपीचे बयान नोंदवून विचारपूस केली असता सदरचे आरोपीने विनापरवाना विटाभट्टी सुरू करण्यासाठी वनक्षेत्रातून माती उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केल्याचे कबूल केले असल्याने वनविभागाने सदरचे गुन्ह्यात वापरलेले ट्रॅक्टर जप्त केले.

          सदर प्रकरणी पुढील तपास श्री प्रशांत खाडे, विभागीय वन अधिकारी चंद्रपूर श्री घनश्याम नायगमकर सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर वन विभाग चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्री विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली, श्री रवी सूर्यवंशी वनक्षेत्र सहाय्यक व्याहाड, श्री एकनाथ खुडे वनरक्षक गायडोंगरी हे करीत आहेत.