विसंगतीतून विनोद तर माणुसकीतून समाज निर्मिती:- किशोर बळी… — गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विशेष मार्गदर्शन…

      रोहन आदेवार

साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी

यवतमाळ/वर्धा..

वर्धा-

     “जगा सदाबहार… सहकुटुंब सहपरिवार” या विषयावर आयोजित व्याख्यानात हास्य, विनोद आणि सामाजिक व्यंगावर मर्मभेदी अचूक बोट ठेवत आपल्या अनोख्या वैदर्भीय वऱ्हाडी शैलीत विसंगतीतून विनोद तर माणुसकीतून सशक्त व समृद्ध समाज निर्मिती होते असे वक्तव्य अकोल्याचे सुपरिचित कवी, गझलकार, निवेदक आणि वाणीत वऱ्हाडी बाज असणारे किशोर बळी यांनी केले. 

       ते वैद्यकीय जनजागृती मंच, इंडियन रेड क्रॉस सोसायटी व द इव्हेंट्स च्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

         वैवाहिक जीवनात घडणाऱ्या गमती जमती,लहान मुलांचे हरवत चाललेलं बालपण, विभक्त कुटुंब पद्धतीचे बालकांवर होणारे परिणाम,बोथट झालेल्या जाणीवा आणि सामाजिक चारित्र्य निर्मितीचा दुष्काळ या साऱ्या बाबी कुटुंबातील संवाद आणि संस्कारांच्या अभावाने घडत आहेत असे मत व्यक्त केले. ग्रामीण भागातील शिक्षणाची झालेली दुरावस्था,शिक्षकांची होणारी कसरत आणि राजकारणाचा घसरत चाललेला स्तर या साऱ्या विषयांवर सटीक शब्दात त्यांनी प्रहार केले,तर तितक्याच हळुवारपणे श्रोत्यांना विसंगतीचे वेगवेगळे किस्से सांगत हास्याचे फवारे देखील उडविले.

     संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा, महात्मा गांधी,साने गुरुजी,महात्मा फुले यांच्या आदर्श शिकवणुकीतून समाज घडावा अशी अपेक्षा व्यक्त केली. अधूनमधून बशीर बद्रचे शेर ऐकवून श्रोत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला.समारोपात संविधानाच्या मूल्यांचे जतन व्हावे आणि सर्वांच्या आनंदाने आपणही आनंदी व्हावे असे मत कवी किशोर बळी यांनी व्यक्त केले.

       तत्पूर्वी कार्यक्रमाच्या पूर्वार्धात दीप प्रज्वलन व आरती करण्यात आली. चार्वी सचिन गरपाळ हिने गण गण गणात बोते या मंत्राचा साधा सरळ अर्थ उपस्थिताना उलगडून सांगितला, तर परी हर्षल पावडे हिचे प्रभू श्रीरामांच्या आगमनाचे बहारदार नृत्य केले.

      आर्वी तालुक्यातील गट शेती करणाऱ्या व फार्मर कपमध्ये सहभागी दहा गटांचे व दोन युवा यशस्वी शेती उद्योजक सचिन पोहाणे व महेश पाटील यांचा सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. या सन्मान कार्यक्रमात वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहन घुगे, वर्धेचे तहसीलदार कोळपे व सेलूचे तहसीलदार स्वप्नील सोनोने, डॉ अरुण पावडे ऍड.अशोक पावडे व डॉ.सचिन पावडे मंचावर उपस्थित होते.

व्याख्याते किशोर बळी यांचा देखील शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

      मुख्य अतिथी वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहन घुगे यांनी आपल्या मनोगतात कुपोषण मुक्त जिल्हा अभियानात डॉ सचिन पावडे आणि सहकारी डॉक्टरांच्या योगदानाबद्दल प्रशंसोदगार काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सचिन पावडे यांनी केले. शाम भेंडे यांनी किशोर बळी यांचा परिचय करून दिला तर शैलेश कराळे यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल गाढवकर यांनी केले.

कार्यक्रमात वर्धेचे आ. डॉ पंकज भोयर, विधान परिषद सदस्य डॉ रामदासजी आंबटकर तसेच समाजातील विविध सामाजिक संघटनांचे सदस्य तसेच निमंत्रित मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसाद देण्यात आला.

       कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय जनजागृती मंच, इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.