कॉग्रेसने गांधी विचार सोडल्यानेच त्यांची हार झाली : डॉ.कुमार सप्तश्री — महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहास प्रारंभ…

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

पुणे : धर्म राजकारण्यांच्या हातात गेला आहे, तो भक्तांच्या ही हातात राहिला नाही. धर्म आणि राजकारणाचा तसा काही संबंध नाही, पण आजकाल राजकीय लोक निवडून येण्यासाठी आणि सत्ता मिळविण्यासाठी धर्मावर अतिक्रमण करून धर्म हातात घेत आहेत, आणि धर्मा धर्मात वाद निर्माण करीत आहेत. सर्व धर्मांचा अंतिम संदेश ही जगात शांतता नांदो हाच आहे. पुढच्या पिढ्यांमध्ये कुठल्याही धर्माविषयी कटुता पोहोचू नये यासाठी सर्व धर्म प्रार्थना आयोजित करून गांधींनी सांगितलेले सत्य आणि अहिंसा धर्म पुढील पिढीला सांगणे आवश्यक आहे. पुण्यात गांधी कळला तर तो जगभर कळेल, पोचेल म्हणून आम्ही येथून गांधी प्रसार, प्रचार आणि गांधी विचार जागृतीचे काम करीत आहोत, हे काम खरंतर सर्व पक्षांनी करायले हवे कारण गांधी विचारांशिवाय जगाला गत्यंतर नाही. कॉग्रेसने गांधी विचार सोडल्यानेच त्यांची हार झाली, यापुढे कॉग्रेसने गांधी विचारांच्या आधाराने जनतेला एकत्र करून त्यांना रस्त्यावर उतरवल्या खेरीज फॅसिझम सरकार पाडता येणार नाही. सारे भारतीय वंशाने गेल्या वीस पिढ्या एकच आहेत त्यामुळे कुणालाही देशा बाहेर जा, असे सांगता येणार नाही असेही मत कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले

            महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’चे उद्घाटन रविवारी सायंकाळी झाले. या सप्ताहाचे पुण्यात १ ते ८ ऑक्टोबर २०२३ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. व्याख्याने, परिसंवाद, पुस्तक प्रकाशन, भजन, शांती मार्च, गांधी दर्शन शिबीर असे विविध कार्यक्रम या गांधी सप्ताहात होणार आहेत.

            गांधी सप्ताह आयोजनाचे हे १२ वे वर्ष आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, प्रा.एम.एस.जाधव, डॉ.शिवाजीराव कदम, अभय छाजेड, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, रतनलाल सोनग्रा, संदीप बर्वे, युवक क्रांती दलाचे कार्यवाह जांबुवंत मनोहर, शहराध्यक्ष सचिन पांडुळे, अप्पा अनारसे उपस्थित होते. सप्ताहाचे सर्व कार्यक्रम गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे होणार आहेत.

सर्वधर्मप्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.भंते सुदसन, पुनीत कौर मान, श्राविका संगीता नाहटा, मौलाना अब्दुल सलाम, डॉ.अजय चंद भागवत, मापगावकर, फादर रॉबिन मंताडौ यांनी प्रार्थना वाचन केले. संविधान प्रस्तावना वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संदीप बर्वे यांनी केले.कुमार सप्तर्षी यांच्या “धर्मा बद्दल” या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन अभय छाजेड यांच्या हस्ते झाले. 

         २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आणि जागतिक अहिंसा दिनाच्या निमित्ताने सकाळी ८ वाजता शुभांगी मुळे आणि सहकाऱ्यांचा प्रार्थना आणि भजनाचा कार्यकम होणार आहे. १० ते ३ पर्यंत सर्वांसाठी प्रसादभोजन आयोजित करण्यात आले आहे. याच दिवशी दुपारी ४ वाजता गांधी पुतळा गांधी भवन ते गोखले पुतळा (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) या मार्गावर ‘शांती मार्च’ काढण्यात येणार आहे. पुणे शहर कायम दंगामुक्त राहावे, या संकल्पासाठी हा शांती मार्च काढण्यात येणार आहे.

         ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘आज यदि गांधी होते तो ‘ या विषयावर डॉ मणिंद्रनाथ ठाकूर (दिल्ली)यांचे व्याख्यान होणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘लोकसभा निवडणुका :आव्हाने आणि पर्याय ‘ या विषयावर परिसंवाद होणार आहे. त्यात पत्रकार विजय चोरमारे आणि श्रीराम पवार तसेच अभिनेते किरण माने आदी सहभागी होणार आहेत.

          ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ पत्रकार पी.साईनाथ यांचे ‘आजचे वर्तमान आणि आव्हाने ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ अभ्यासक सुधींद्र कुलकर्णी यांचे ‘गांधी समजून घेताना ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे. ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता अविष्कार निर्मित ‘उमगलेले गांधी’ हा अभिवाचनाचा प्रयोग होणार आहे. त्यात दिलीप प्रभावळकर, सुहिता थत्ते, धनश्री करमरकर,दीपक राजाध्यक्ष सहभागी होणार आहेत. दि.८ ऑक्टोबर रोजी गांधी दर्शन शिबीर होणार असून त्यात माजी न्या.सत्यरंजन धर्माधिकारी, डॉ.कुमार सप्तर्षी, डॉ.शैलजा बरूरे मार्गदर्शन करणार आहेत.