दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : तिर्थक्षेत्र आळंदी परिसरात वनखात्याची अंदाजे हजार एकर वनक्षेत्र आहे. याच वनक्षेत्रात पांडव कालीन शिवमंदिर आणि आळंदी हे प्राचीन शिवपीठ असल्याने या भागात अनेक शिवलिंग आहे. ही सर्व शिवमंदिर तसेच तिर्थक्षेत्र याच वनविभागात स्थापित आहे. याठिकाणी शासनामार्फत वन पर्यटन ऑक्सिजन पार्क विकसित व्हावे अशी मागणी वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कडे भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष हभप संजय महाराज घुंडरे यांनी यावेळी निवेदन देऊन केली. याप्रसंगी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, उद्योजक श्रीकांत घुंडरे, इंद्रायणी सेवा फौंडेशनचे पदाधिकारी जनार्दन पितळे, राहुल गोडसे उपस्थित होते.
यावेळी संजय महाराज घुंडरे यांनी सांगितले की हे वन विभागाचे क्षेत्र अतिशय सुंदर निसर्गरम्य परिसरात असून त्यात अनेक वनजीव वास्तव्य करत आहे, या ठिकाणी या परिसरातील अनेक औद्योगीक कंपन्या, हाॅटेल व्यवसायिक, नागरिक हे या परिसरात कचरा टाकुन या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. भटकी कुत्री, वन्य शिकारी मोरांची शिकार करतात त्यामुळे मोरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या ठिकाणी मोरांना व अन्य पशुपक्षांना संरक्षण दिल्यास येथे पर्यटन वाढण्याची खात्री आहे. जवळपास एकही पर्यटनस्थळ नसल्याने येथे पर्यटनस्थळ उपलब्ध करुन दिले तर येथे सामान्य नागरीक, भाविक, वारकरी यांना त्याचा लाभ घेता येईल असे घुंडरे यांनी सांगितले.