माझी आजी भल्या पहाटे रोज ताका चे डेरे मधे दही टाकून त्यात पाणी मिसळून रवीने घुसळण करायची,आणि ताकावर लोणी जमा व्हायची ती जमा करायची,,या प्रक्रियेतून एक मोठा लोण्याचा गोळा तयार व्हायचा,त्याची चव आणि वास हा मला जसा हवा हवासा वाटे,तसेच घरात असलेल्या दोन तीन मांजराना पण वाटे.ती मांजरे आणि मी आजीच्या हाताकडे टकमक पाहत असायचो.
लोणी कधी खायला मिळेल याची घाई आम्हाला असायची,वाट पाहून दमलो की,माझी मागणी सुरू असायची,मांजरे पण म्याँव म्याँव करून ओरडायला लागायचे,आजीचे माझ्यावर जास्त आणि मांजरावर पण प्रेम होते,पण माझ्या पेक्षा कमीच.
म्हणून ती माझ्या हातावर लोण्याच्या अंश असलेला छोटासा गोळा ठेवायची.मी तो डाव्या हाताच्या तळा वर घेऊन उजव्या हाताच्या बोटाने थोडे थोडे चाटायचा,म्हणजे एन्जॉय म्हणजे मजा घेत खायचा.हे पाहून बिचारी मांजरे आजीला मस्का लावण्यासाठी म्हणून तिच्या दोन्ही पायांना आपले अंग घासायचे.
म्याँव म्याँव करीत तिचे पाय पण चाटायचे.शेवटी तिला दया यायची आणि त्यांच्यापुढे पण लोण्याचे छोटे छोटे गोळे ती ठेवायची,तेंव्हा अधाशीपणे म्याँव म्याँव करीत ते त्याची मजा घ्यायचे,खाऊन झाल्यावर जिभल्या वाटायचे.
असेच कित्येकांच्या घरात मी पाहिलंय,काही लोकांना मांजरे पाळण्याचा शोक आहे,चार चार मांजरे त्या घरात,पिल्ले असलेली मांजरी पण असते.त्या घरातील माणसे जेंव्हा टेबलावर जेवण करतात तेंव्हा ती मांजरे त्यांच्या पायाला आपले अंग घासत,आवाज करीत त्यांना मस्का लावत असतात.
मग त्याची त्यांना दया येऊन ते लोक त्या मांजरा ना चपात्याचे तुकडे टाकतात.त्यावर ते खुश असतात.
असेच चित्र आज राजकीय क्षेत्रात दिसून येत आहे.राजकीय कार्यकर्ते,राजकीय पक्ष,राजकीय संघटना,राजकीय नेतृत्व यांना फक्त स्वार्थाची भूक आहे.तिला मर्यादा नाही,किती पैसा बाळगावा,किती संपती बाळगावी याचे भान नाही.
आपल्या पिढीची व्यवस्था झाली तर थांबायला हवे,एकाच पिढीची नसून पुढील सात पिढीची व्यवस्था होईल एव्हडी संपती कमावण्याची हाव यांना असल्यामुळे,स्वार्थ बोकाळल्यामुळ संपती जमविण्याचे प्रभावी आणि खात्रीचे साधन म्हणजे ” सत्ता ” तिथे कसे पोहचायचे ? पोहचायचे ? आणि पोहचल्या नंतर मुंगळा जसा गुळाला चिकटतो,तसे खुर्चीला कसे चिटकून रहायचे ? हाच एक कलमी कार्यक्रम यांचा असतो.
या राजकीय लोकांना ना ध्येय, ना दिशा,ना विचारसरणी , ना पक्ष निष्ठा, ना नेतृत्व निष्ठा, ना समाज निष्ठा, ना देशनिष्ठा, ना संवेदनशीलता.केवळ संपत्तीचा हाव हाव हाव.खरे तर मानसिक दृष्ट्या हे संपत्तीचे लोभी गुलाम बनले आहेत.संपत्तीसाठी म्हणून सत्तेचे गुलाम,हे सत्तेचे मालक नसून सत्तेच्या ताटे खालचे मांजर आहेत.लोण्याचा गोळा खाण्यासाठी,ताक खुसळून लोणी काढणाऱ्या मोठ्या पुढाऱ्यांच्या पायात पायात घुटमळणारे,पाय चाटनारी ही जमीनदार,छोटे कारखानदार,बहुजनांचे पुढारी,मागासवर्गीयांचे पुढारी सारेच सत्तेचे ताट आणि त्याच्या खालचे मांजरे होऊन वावरताना फिरताना दिसतात,ही मांजरे लोण्याचे छोटे छोटे गोळे खाऊन मोठमोठ्या बोक्यांचे गुलाम होऊन निवडून दिलेल्या आपल्याच बांधवांना बेइमानी करीत आहेत.
यांचे कडे काही स्वप्न,धेय्य,निष्ठा,देशप्रेम,समाजनिष्ठा,पक्षनिष्ठा,नेतृत्वावर विश्वास असला असता,काही परिवर्तन करण्याची जिद्द राहिली असती,तर स्वातंत्र्य सैनिक जसे जेल मध्ये गेले,तसे हे आपली चूक कबूल करून जेल भोगून आले असते,पण नाही.कारण यांना अपमान वाटतो.
भ्रष्टाचार करताना यांची इज्जत जात नाही,पण जेल भोगली की इज्जत जाते.खरे तर आपल्या चुकीचे प्रायश्चित म्हणजे जेल असते,या पेक्षा यांना मोठ्या बोक्याच्या ताटाखालचे मांजर होऊन रहाण्यात धन्यता वाटते.कारण या विषमतावादी व्यवस्थेचे हे गुलाम आहेत.
गुलामाची मानसिकता ही ताटाखालचे मांजर बनून रहाण्यातच धन्यता मानणारी असते.यांना स्वाभिमान , चिड,अपमान ,दर्जा ,इत्यादी गोष्टीचे काहीच वाटत नाही.
असे असेल तर मग यांचे कडून परिवर्तनाची अपेक्षा तरी काय म्हणून करायची ? मग असे लोक सत्तेत तरी कशाला हवेत ?



