लौकिक अर्थाने केवळ दीड दिवसाची शाळा शिकलेले साहित्यसम्राट अण्णाभाऊनी साहित्याचा डोंगर न्हवे तर हिमालय उभा केला.त्यांची आज जयंती!.
स्वयंप्रकाशित व्हा हा उपदेश अण्णांनी आचरणात आणला.स्वताच्या अनुभवांनी परिस्थितीचे अचूक निरीक्षण करून त्यांनी ज्ञानक्षेत्रात किती मोठी झेप घेतली हे त्यांची साहित्यसंपदा पाहून लक्षात येते.
चार दोन पांढरेफट्ट पुस्तके लिहून अखिल भारतीय साहित्यसंमेलनाची अध्यक्षस्थाने भूषविलेली अनेक दीडदमडीचे साहित्यिक या देशाने पाहिले आहेत.
पण,केवळ ब्राम्ह्नेत्तर जातीत जन्माला आल्याने अण्णाभाऊना अध्यक्ष स्थान सोडा पण साधे निमंत्रणही आले नाही हे ऐकून मन विषन्न होते.
अन्नाभाऊंच्या साहित्याची केवळ यादी पाहिली तर डोळे दिपून जातील.वाचायला दम लागेल.अतिशय खडतर जीवन जगलेल्या अन्नाभाउनी मात्र आम्हाला साहित्याच्या सौंदर्याचा अनमोल ठेवा ठेवून गेले.
अण्णांची,त्यांच्या कलाकारीची कदर ना शासन दरबारी केली,ना समाजाने केली.हो समाजानी सुद्धा केली नाही!,अन्यथा अण्णाभाऊंच्या क्रांतीकारक विचारांचा भडका उडून आमचा बहुजन समाज कधीचाच खऱ्या स्वातंत्र्याला गवसणी घातला असता.
आज आमची पिढी शिकत आहे.त्यांना बहुजनांचे नायक समजत आहेत.अण्णाभाऊ हे कम्युनिष्ठ की आंबेडकरवादी या वादात न पडता त्यांच्या साहित्यातून मांडलेल्या भूमिकेचा विचारच आपण करावा.
1 ) बुद्धाची शपथ…
बुद्धाची शपथ या शीर्षकाखाली अण्णाभाऊंनी एक लेख लिहिला आहे.तो नक्कीच १९५६ च्या नंतरचा होता.मास्तर उर्फ विलास हा आपल्या कथेचा नायक बनवला.बुद्धाच्या मार्गाने गेला तर व्यक्ती स्वाभिमानी,सदाचारी बनतो याचा उत्कृष्ट नमुना त्यांनी मांडलेला आहे.
२ ) फकीरा…
आण्णाभाऊंची सर्वोत्कृष्ट साहित्यकृती म्हणजे फकीरा होय.डॉ.बाबासाहेबांच्या झुंझार लेखणीला अर्पण केलेली ही कृती आपल्याला खूप काही शिकवून जाते.ही अर्पणपत्रिका बाबासाहेबांच्या विचाराचे दर्शन घडविते.तसेच,व्यक्तीपुजक न होता बाबासाहेबांचे वैचारिक वारस बना हा जणू संदेशच त्यांनी दिला.
ही बाब बौद्ध व मातंग समाजांनी अजूनही लक्षात घेतलेली दिसत नाही.अण्णाभाऊ साठे यांची ‘फकिरा’ ही कादंबरी त्यांच्या साहित्यातील सर्वात प्रभावी आणि क्रांतिकारी कृती मानली जाते.
या कादंबरीतील नायक फकिरा हे मांग समाजातील एक तरुण आहे,जो जातीच्या उतरंडीला आणि सामाजिक शोषणाला थेट आव्हान देतो.फकिरा आपल्या गावातील सावकारी आणि सामंती व्यवस्थेविरुद्ध बंड करतो.त्याच्या व्यक्तिरेखेद्वारे अण्णाभाऊंनी मांग समाजातील व्यक्तीच्या आत्मसन्मानाचा आणि स्वातंत्र्याचा लढा चित्रित केला.
फकिरा जातीच्या बंधनांना नाकारून समाजातील खालच्या स्तरातील लोकांना एकत्र करतो आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे धाडस दाखवतो. ही कादंबरी जातीच्या उतरंडीला तोडण्याचा आणि सामाजिक समतेचा संदेश देते.
३ ) स्त्रीमुक्तीचा लढवय्या अण्णाभाऊ….
चित्रा,वैजयंता, चंदन,आवडी,आग,या कादंबऱ्यातून स्त्रियांच्या व्यथा मांडल्या आहेत.तमासगीर स्त्री,वेश्या व्यवसाय करणारी स्त्री,मुरळी ह्यांच्या शोषणावर प्रकाश साहित्य अण्णांनी लिहिले आहे.समाजव्यवस्थेत ह्या नायिका पारंपारिक मार्गाने जीवन जगतात.विद्रोही नायिका आणि त्यातही दलित जातीतून आलेल्या संघर्षरत नायिका रेखाटणारे अण्णाभाऊ साठे हे विद्रोही मराठी साहित्यिक ठरतात.
अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होते.
या विचारांनी त्यांना जातीप्रमाणेच लिंगभेदाच्या शोषणाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली.त्यांच्या साहित्यातील स्त्री पात्रे केवळ शोषणाच्या बळी नसतात,तर त्या स्वतःच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आणि समाजात बदल घडवणाऱ्या व्यक्ती आहेत.
अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून स्त्रियांच्या शिक्षण,स्वातंत्र्य आणि सन्मानाचा पुरस्कार केला,जे त्यांच्या काळातील प्रगतिशील विचारांचे द्योतक आहे.
अण्णाभाऊंच्या साहित्याने दलित आणि शोषित समाजातील स्त्रियांना स्वतःच्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा दिली.त्यांच्या कृतींनी तमाशा कलाकार आणि खालच्या जातीतील स्त्रियांच्या जीवनाला साहित्यात स्थान मिळवून दिले आणि त्यांचे शोषण समाजासमोर आणले. त्यांचे साहित्य आजही स्त्रीमुक्ती आणि सामाजिक समतेच्या लढ्यात प्रेरणादायी आहे.
४ ) जैविक बुद्धीजीवी…
ग्रॅमशीच्या मते,जैविक बुद्धीजीवी हा असा व्यक्ती असतो जो स्वतःच्या सामाजिक वर्गाच्या अनुभवातून,संघर्षातून आणि संस्कृतीतून निर्माण होतो आणि त्या वर्गाच्या मुक्तीसाठी कार्य करतो.
अण्णाभाऊ साठे यांचा जन्म मांग या खालच्या जातीत झाला,आणि त्यांनी शिक्षणाचा अभाव,सामाजिक बहिष्कार आणि आर्थिक शोषण यांचा सामना केला.
या अनुभवांतूनच त्यांचे साहित्य आणि विचार घडले,ज्यामुळे ते आपल्या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणारे बुद्धीजीवी बनले.
अण्णा स्वप्नरंजनवादी साहित्यिक नव्हते.त्यांनी आयुष्यभर जे जगले,जे भोगले तेच त्यांनी आपल्या साहित्यातून मांडले.त्यांचा कुठलाच नायक अथवा नायिका ह्या उसणवारीने आणलेल्या न्हवत्या.
तळागाळातील,उपेक्षित,दुर्लक्षित अशा पात्रांना त्यांनी मनाचे स्थान उपलब्ध करून दिले.इतर साहित्यिक मात्र स्वप्नात जगणारे वाटतात.ना.सी.फडके यांचे उदाहरण घेतले तर आपल्याला समजून येईल.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीबद्दल काहीतरी लिहावे म्हणून फडकेंनी कारमध्ये बसून मुंबईचा मोर्चा बघितल्याचा उल्लेख उषा डांगे करतात.
परंतु अण्णा मात्र हातात डफ घेऊन,पोलिसांचा पहारा चुकवत लोकांना चेतवत होते.अटक करून घेतली.याचा अर्थ ते खऱ्या अर्थाने जैविकरित्या कामगार वर्गाशी आणि नंतरच्या काळात दलित चळवळीशी जोडल्या गेले.
प्रस्थापित साहित्यिकांनी ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली आहे हा समज,विचार,दृष्टीकोन उभा केला तो त्यांच्या हितसंबंधाखातीर.
अण्णांनी मात्र ही पृथ्वी कष्टकरी,शेतकऱ्यांच्या हातावर ही तरलेली आहे हे सांगितले.या अर्थाने अण्णाभाऊ जैविक बुद्धीजीवी ठरतात.
५ ) आमचा वैचारिक वारसा…
छ.शिवरायांवर पोवाडा रचून त्यांनी आपली वैचारिक परंपरा सांगून टाकली.मागे ” बुद्धा शपथ ” या कथेतूनही त्यांचा अंतीम थांबा बुद्धच होता हे आमच्या बांधवांना सांगण्याची गरज आहे.पुढे दलित साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना हा महासाहित्यिक म्हणतो की,
❝ जग बदल घालूनी घाव,सांगुनी गेले मला भीमराव.❞
जगात बदल करण्यासाठी घाव घालण्यासाठी बाबासाहेबांनी आपणास सांगीतलेले आहे असा दावा अण्णाभाऊ करतात.तेव्हा त्यांची आंबेडकरवादी विचारधारा समोर येते.
अण्णाभाऊंचे समकालीन महाकवी वामनदादा कर्डक यांनी सुद्धा वरील वैचारिक परंपरेत भर घालून म्हणतात की,
❝ अण्णाभाऊ सांगून गेले,व्हा भीमाचे व्हा !
सावित्रीची ममता आणि ज्योतिबाची प्रीत व्हा !! ❞
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अण्णाभाऊना सांगितले की आता बदल करण्यासाठी वर्मावर घाव घाला आणि अण्णाभाऊं वामनदादांना सांगून गेले की आता फक्त भिमाचेच म्हणजे आंबेडकरवाडी व्हा रे,याशिवाय पर्याय नाही असेच जणू त्यांना म्हणायचे आहे.
मातंग समाज आणि बौद्ध समाज यातील चालत आलेली विरोधी भावना तोडून आंबेडकरवादी बनण्यास अण्णाभाऊ सांगतात.
६) रामराज्य अथवा हिंदुराष्ट्र विषयक अण्णाभाऊ साठे यांचे विचार…
‘राम व्हा,राम व्हा
राम व्हा हिंदवासी सारे| बोल मंत्र्याचे ऐका रे||
भरतासम बसा ठाण मांडूनी|
किंवा भटका वल्कले नेसूनी |
लक्ष्मणाचा आदर्श ठेवुनी | उपवासी रहा कंबर बांधूनी |
वनवन फिरणारे| बोल मंत्र्यांचे ऐका रे || 1||
अठरा पद्मे वानर होऊनी | कंदमुळे खा बारिक चावूनी |
रामभक्तीचे सुव्रत घेऊनी |
हळू हळू या कुणी मारूती होऊनी|
पृच्छाने लंका जाळणारे| बोल मंत्र्यांचे ऐका रे ||
ना तरी कर्फ्यू आर्डर येईल | इकडून गोळी तिकडे जाईल |गुंड कायदा पिच्छा पुरवील |येरावड्याला घेऊन जाईल|
दळाया लाविल हारबरे ||
रामराज्य आल्यावर कंदमूळं खावून,उपाशीतापाशी झाडपाला,साली अंगाला गुंडाळून,अनवाणी पायांनी वनात भटकत फिरावं लागेल हे अण्णाभाऊ आपल्याला सूचित करतात.
तेव्हा अण्णाभाऊ साठे यांचे अनुयायी म्हणून आपण आपल्या देशाला हिंदू राष्ट्र नव्हे तर संविधानाधिष्टीत असलेले लोकशाही गणराज्य मजबूत करण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे.
६ ) अण्णाभाऊ साठे आणि आजचा समाज…
आपल्या साहित्यातून अंधश्रद्धा,हुंडाबळी,शोषणाविरुद्ध बंडखोरी मांडणारे अण्णांचा जातीबांधव मात्र आज या शिकवणुकीच्या अगदी विरुद्ध वर्तन करताना दिसून येत आहे.
चातुर्वर्ण्य धर्मातील प्रस्थापित जात असलेला महाराष्ट्रातील समाजबांधव गुलाम करणार्यांचा धर्म सोडून तो आज फर्स्ट स्टेजला शिव धर्माची स्थापना करून लास्ट स्टेजला बौद्ध धर्मासाठी राखून ठेवलेला दिसून येतो आहे.
परंतु त्याच व्यवस्थेतील अस्पृश्यादिंचे जीवन जगणारा समाज मात्र तिथेच खितपत पडला आहे.त्यांना अण्णाभाऊची ” जग बदल घालूनी घाव सांगुनी गेले मला भीमराव” ही साद ऐकूच आलेली नाही.पण ही बेकी आम्ही भेदणार ! एकी निर्माण करणार. अशावेळी,
“जग बदल घालूनी घाव
सांगुनी गेले मला भीमराव…..
हे अण्णाभाऊंचे शब्द आपल्याला परिवर्तनाच्या वाटेवर साथसोबत करतील अशी अपेक्षा आहे.अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची जोपासना करणे अत्यंत गरजेचे आहे.
वामनदादा म्हणतात…
सखा रे अण्णा भाऊ साठे
आमचा सखा रे…..
माळावरनं रान फुलेंचं,हेरलं माझ्या भीमानं….
जे जे उगवत ते ते सारं,पेरलं माझ्या भीमानं….
जपा रे या साठेच्या,उभ्या पिकाला जपा रे…
*****



