गडचिरोलीसाठी असलेली जगाची धारणा निश्चितच बदलेल – जिल्हाधिकारी, संजय मीणा…. — महाराष्ट्र दिनी मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात प्रतिपादन….

डॉ.जगदीश वेन्नम

    संपादक

 गडचिरोली, दि.1 मे : येणारा काळ गडचिरोलीकरांसाठी अदभुत व अविश्वसनिय असणार आहे. येणारी पिढी जिल्हयाच्या नव्या व शाश्वत अर्थव्यवस्थेसह उभी राहणार आहे. विकास सर्वांना हवा आहे. आता कुठे या गतिमान विकासाला वेगवेगळ्या योजना, उपक्रम, नव उद्योगातून सुरूवात झाली आहे. विकासाच्या या प्रक्रियेला सकारात्मकतेने पाठिंबा द्या, विश्वास ठेवा येणारा काळ आपलाच असेल असे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी आवाहन केले. गडचिरोलीसाठी असलेली जगाची धारणा निश्चितच बदलेल आणि आम्ही प्रशासन व शासन त्या दिशेने काम करत आहोत आणि तुम्हीही त्या दिशेने काम करा असेही ते पुढे म्हणाले. गडचिरोली मुख्यालयी महाराष्ट्र दिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमावेळी ते जनतेला उद्देशून बोलत होते. या कार्यक्रमात ध्वजारोहण जिल्हाधिकारी यांचे हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, सर्व विभागांचे विभागप्रमुख, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.

           महाराष्ट्र राज्य स्थापनेचा आज 63 वा वर्धापन दिन साजरा झाला. यावेळी त्यांनी जिल्हयातील विविध विकास कामांबद्दल माहिती दिली. शासनाच्या जनकल्याणकारी योजना नागरिकांच्या दारी हा हेतु समोर ठेवून शासकीय योजनांची जत्रा हे अभियान गडचिरोलीत विविध तालुक्यांमध्ये यशस्विपणे राबविले जात आहे. आत्तापर्यंत गडचिरोली जिल्हयात 26 ठिकाणी योजनांची जत्रा भरविण्यात आली आहे. यामध्ये एकुण 2,23,930 लाभार्थ्यांना वेगवेगळया योजनेत लाभ वितरीत करण्यात आला. जिल्हयातील गोंडवाना विद्यापीठाच्या भूसंपादन प्रक्रियेला दहा वर्षानंतर प्रशानाच्या तत्परतेने पुन्हा सुरूवात झाली आहे. वडसा गडचिरोली या नवीन रेल्वे मार्गाला वेग देण्यासाठी १ हजार ९६ कोटी इतक्या द्वितीय सुधारित खर्चास आणि राज्य शासनाच्या ५० टक्के आर्थिक सहभागास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मोबाईल कनेक्टीव्हीटीसाठी जिल्हयात दुर्गम भागात 544 टॉवर उभे केले जात आहेत. माननीय प्रधानमंत्री यांच्या उद्दीष्ठानुसार महत्त्वकांक्षी जल जीवन मिशन कार्यक्रम जिल्हयात राबविण्यात येत आहे. हर घर जल या उद्देशाने मार्च 2024 पर्यंत एकुण 2049 गावे, वाड्या व वस्त्यांमधे 2.41 लक्ष नळ जोडणी करण्याचे उद्द‍िष्ट आहे. एप्रिल 2023 अखेर 1.64 लक्ष नळ जोडण्या पुर्ण झाल्या आहेत असे ते पुढे म्हणाले.

          पोलीसांच्या मदतीने दुर्गम भागात विविध योजना लोकांपर्यंत पोहचण्यासाठी दादालोरा खिडकी, जनजागरण मेळावे, रोजगार मेळावे राबविले जातात. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत जिल्हयात 300 आपदा मित्र तयार करण्यात आले आहेत. एकल केंद्रातून 543 ग्रामसभातून 218 ग्रामसभा प्रशिक्षित केल्या. यातील 1166 प्रतिनिधींनी प्रशिक्षण प्राप्त केले आहे. सद्या एक एकल केंद्र सुरू असून पुढिल 3 केंद्रांचे काम सुरू आहे. नुकत्याच जिल्हयातील 78 ग्रामसभांची नरेगामधे अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नोंदणी झाली आहे. याव्यतिरीक्त नाविण्यपूर्ण उपक्रमांमधे दिशा, फुलोरा, मॉडेल स्कुल, मुस्कान, दादालोरा खिडकी, अल्फा अकाडमी यांद्वारे जिल्हयातील नागरिकांना प्रशासनाकडून सहकार्य केले जात आहे असे ते म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना उच्च दर्जाचे व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध होण्याकरता 3 मार्च पासून प्रोजेक्ट उडान सुरू झाला आहे. या उपक्रमांतर्गत रोजगार कौशल्य संस्था पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नावाने रजिस्टर करण्यात आली आहे. त्या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार युवक युवतींना प्रशिक्षण व रोजगार मेळाव्यांच्या आयोजनातून रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हयात या उपक्रमांतर्गत आत्तापर्यंत 32 वाचानालय सुरू करण्यात आली आहेत.

           येत्या 2047 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पुर्ण होत आहेत. अमृत महोत्सवानिमित्त विकसित भारत 2047 हा शासनाचा संकल्प आहे. देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रीलीयन तर राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रीलीयन पर्यंत नेहण्यासाठी प्रत्येक जिल्हयाचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. गडचिरोली जिल्हयाचे योगदान निश्चितच 1 ट्रीलीयन अर्थव्यवस्था करण्यामधे महत्त्वाचे असणाार असल्याचा विश्वास त्यांनी भाषणात दिली. यावेळी परेड संचलन झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जी.एम.वराडकर, ओमप्रकाश संग्रामे, चेतन ठाकरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुळ यांनी मानले.

      उत्कृष्ठ कामगिरी केलेल्यांचा गौरव 

आदर्श तलाठी पुरस्कार सचिन नामदेवराव सोमनकर, तलाठी साजा क्र. 13 वाघोली, तहसिल कार्यालय, चामोर्शी यांना प्रदान करण्यात आला. तसेच 1 मे 2023 रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून उमेदवारांना नियुक्ती पत्र वितरीत करण्यात आले. श्री. मंडल राकेश परिमल, राज्यकर निरीक्षक (वस्तू व सेवा कर विभाग), श्री. तोरानकर सुरज भाऊराव, राज्यकर निरीक्षक (वस्तू व सेवा कर विभाग), श्री. वाळके प्रशांत मोरेखश्र्वर, भूमि अभिलेख (भूकरमापक तथा लिपीक), श्री. मडावी अविनाश आसाराम, भूमि अभिलेख (भूकरमापक तथा लिपीक), श्री. लाकडे पुष्कर विजय, भूमि अभिलेख (भूकरमापक तथा लिपीक), श्री.माझी दिलीप निखील, भूमि अभिलेख (भूकरमापक तथा लिपीक), कु.बगमारे अश्विनी मनोहर, भूमि अभिलेख (भूकरमापक तथा लिपीक), श्री.पठाण झेबानाझ हबीबखान, भूमि अभिलेख (भूकरमापक तथा लिपीक), श्री. सदमेक आदित्य अशोक, राज्य उत्पादन शुल्क (दुय्यम निरीक्षक), श्री. कुळसंगे संदिप मोराती, परिवहन महामंडळ (चालक तथा वाहक).