रोखठोक
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
कायद्यानुसार आमदार आणि अधिकारी बनतात.तेच आमदार आणि अधिकारी कायद्याला पायदळी तुडवून स्वत:ला कायद्यापेक्षा मोठं समजतात असे दिसून येते आहे.
वास्तविकता आमदार आणि अधिकारी हे कायद्याचे अंग असतात.त्याच आमदारांनी आणि अधिकाऱ्यांनी कायद्याची पायमल्ली करावी हा कुठल्या कर्तव्याचा भाग आहे? आणि कायद्याचे उल्लंघन करीत शासकीय गाड्यात स्वत:च्या पक्षाचे प्रचार व जनसंपर्क कार्यालय आमदारांनी थाटावे,हा कुठला उद्दामपणा आहे?.
पदाच्या दुरुपयोगातंर्गत बेकायदेशीर उद्दामपणात मुजोरी आणि अहंकार दडलेला असतो,याची जाणीव स्वत:ला लोकप्रतिनिधी समजणाऱ्या आमदारांना आणि अधिकाऱ्यांना असणे आवश्यक आहे.

शासकीय गाडे प्राध्यापक व्यक्तींना व्यवसायासाठी कसे दिले?…..
चिमूर येथील स्थानिक रहिवासी असलेले श्री.सुरेश नरहरी लाचलवार हे माजी प्राध्यापक आहेत,एल.आय.सी.एजंट आहेत,आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत.वास्तविकता आर्थिकदृष्ट्या सक्षम,प्राध्यापक,असलेल्या व्यक्तींना शासकीय गाडे व्यवसायासाठी देता येत नाही.
शासकीय गाडे हे ज्यांना खरोखरच रोजगाराची गरज आहे,आर्थिक दृष्ट्या कमजोर आहेत,अशा गरीब,गरजू,बेरोजगार,होतकरुंव्यक्तींना दिली जातात.
चिमूर ग्रामपंचायतीच्या तात्कालीन ग्रामसेवकांनी,सरपंच आणि सदस्यांनी नियमांना बाजूला सारून जे प्राध्यापक आहेत,आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत,अशा व्यक्तींना शासकीय गाडे देऊन,शासनाला व वरिष्ठ अधिकाऱ्यांना खोटा व असत्यावर आधारलेला गाडे वाटपाचा अहवाल सादर केला असावा असे दिसून येते आहे.
न.प.मुख्याधिकारी यांनी स्पष्ट केले पाहिजे…..
माजी प्राध्यापक श्री.सुरेश नरहरी लाचलवार यांना व्यवसायासाठी नियमानुसार गाडे दिले असल्यास,तसे नगर परिषद चिमूर मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी स्पष्ट केले पाहिजे आणि गाडे वाटपाची कायदेशीर बाजू चिमूरकरांना समजावून सांगितले पाहिजे आणि चिमूरकरांच्या मनातील स़भ्रम दूर केला पाहिजे.
याचबरोबर व्यवसायासाठी देण्यात आलेले शासकीय गाडे हे संबंधित व्यक्तींच्या मालकी हक्काचे राहातं नाही किंवा ते गाडे कुणालाही पक्ष प्रचारासाठी आणि पक्ष जनसंपर्क कार्यालयासाठी देता येत नाही,हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे.
असे असताना सेवानिवृत्त प्राध्यापक श्री.सुरेश नरहरी लाचलवार यांच्या नावाने असलेले शासकीय गाडे भाजपाच्या पक्ष प्रचारासाठी आणि पक्ष जनसंपर्क कार्यालयासाठी,देण्यात आले आहे,यावर सुध्दा चिमूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी आपले मत व्यक्त केले पाहिजे.
पदाचा दुरुपयोग कशासाठी आणि का म्हणून?…..
उद्दामपणा म्हणजे अतिरेकी अहंकार,गर्विष्ठपणा किंवा इतरांना कमी लेखण्याची वृत्ती.जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात किंवा बोलण्यात उर्मटपणा असतो आणि ती स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजते,तेव्हा त्या वर्तनाला उद्दामपणा म्हणतात.
शासकीय गाड्यात असलेल्या भाजपाच्या प्रचार व जनसंपर्क कार्यालयातंर्गत असाच बेकायदेशीर उद्दामपणा चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किर्तीकुमार भांगडिया आणि चिमूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांच्यात दिसून येतो आहे.
उद्दामपणाची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे अहंकार,संपत्ती,अधिकार किंवा गुणांचा अतिगर्व असणे होय.दुसऱ्यांच्या योग्य व कायदेशीर विचारांचा,भावनांचा किंवा अधिकारांचा आदर न करणे होय.नियम किंवा वरिष्ठांच्या सूचनांना न जुमानता स्वतःच्या मर्जीनुसार वागणे होय.
उद्दामपणा ही एक अशी नकारात्मक वृत्ती आहे,जी सर्वसाधारण माणसाच्या संबंधांमध्ये दुरावा तर निर्माण करते,पण,बेकायदा वृत्ती व कृती करण्यास त्यांच्यातील उद्दामपणा त्यांना रोखत नाही.
जनतेचा व कायद्याचा आदर केला पाहिजे…..
म्हणूनच आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी जनतेचा व कायद्याचा आदर करुन शासकीय गाड्यातील भाजपाचे कार्यालय हटवले पाहिजे.
याचबरोबर न.प.मुख्याधिकारी यांनी सदर भाजपा कार्यालय प्रमुखांना कायदेशीर नोटीस बजावली पाहिजे आणि शासकीय गाड्यातील भाजपाचे प्रचार व जनसंपर्क कार्यालय हटवले पाहिजे.
तद्वतच श्री.सुरेश नरहरी लाचलवार यांना मुख्याधिकारी यांनी कायदेशीर नोटीस बजावण्यात आली पाहिजे आणि कोणत्या कायद्यानुसार भाजपा प्रचार व जनसंपर्क कार्यालयाला शासकीय गाडे दिले याची लेखी माहिती मागितली पाहिजे.
आणि त्यांना व्यवसायासाठी दिलेले शासकीय गाडे रद्द केले पाहिजे,याच मताचे चिमूरकर असावेत.



