पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी देसाईगंज-वडसा
दखल न्यूज भारत
देसाईगंज :- गत चार-पाच वर्षांपासून मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र देसाईगंज वनपरिक्षेत्रात पहायला मिळाले. परंतु सदरील चित्र इतिहास जमा झाले असून भविष्यात वाघ व मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनाच घडू नयेत म्हणून वडसा वनविभागाने बऱ्यापैकी उपाय योजना केल्या असल्याची माहिती वनपरीक्षेत्राधिकारी कैलास धोंडणे यांनी आयोजित पत्रकार परीषदेतून पत्रकारांना दिली. मात्र नागरीकांनी देखील काही बाबतीत वनविभागाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
देसाईगंज वनपरिक्षेत्रात हल्ली ६ ते ७ वाघांचा वावर आहे. यात ३ वाघीनींचा समावेश आहे. याशिवाय १० ते १५ च्या संख्येत बिबट आहेत. या हिंस्त्र प्राण्यांचा वावर एका विशिष्ट वेळेत होत असतो. त्या वेळेत नागरीकांनी जंगलात जाणे टाळावे. जंगल परीसरात ३५० च्या वर कॅमेरे लावले आहेत. जंगलात असणाऱ्या वाघांचे नामकरण केले आहे. जंगलात लावलेले कॅमेरे प्रत्येक वाघांच्या हालचाली टिपत असतात. कॅमेऱ्यांनी टिपलेल्या वाघांच्या हालचालीवरून कोणता वाघ कोणत्या परीसरात आहे हे कळते.त्यावरुन त्या त्या परीसरातील नागरीकांना वनविभागाच्या वतीने सतर्क केल्या जाते.यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यंत्रणेने सतर्क केल्यानंतर त्या परीसरात नागरीकांनी जाणे-येणे करणे टाळणे गरजेचे आहे. याशिवाय गावात मुनारी देखील देण्यात येते. यांचीही दाखल नागरीकांनी घेणे गरजेचे असते.
वन्यप्राण्यांचा अधिवास अणि मानवी वस्त्या यांच्यातील अंतर कमी होत असल्याने मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना घडत आहेत.अशा परीस्थितीत नागरीकांनी अफवांवर विश्वास न ठेवता वनविभागाशी त्वरीत संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान वडसा वनविभागाचे जिवशास्त्रज्ञ ललीत उरकुडे यांनीही पत्रकार परीषदेत वन्यप्राण्यांच्या जणूकीय परीस्थितीबाबतची माहिती दिली. त्यांचे वैशिष्ट्य, वन्य प्राण्यांचा वावर, अधिवास, प्रजनन काळ व अन्य माहिती देखील दिली. जंगल परिसरात जातांना समुहाने जाणे,रात्रीच्या वेळी अनावश्यक वावर टाळने आणि वन्यजीव आढळल्यास त्यांना चिथावणी न देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय गावाशेजारील वनपरीसरात हत्तींचा कळप दिसल्यास त्यावर करावयाच्या उपाययोजनेवर देखील पत्रकार परिषदेत माहिती दिली. एकुण मानव -वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



