Home Crime चौकशी अहवालानंतर ग्रामसभेचा दणका…. — रु.९७ हजार ५५१ वसुलीची मागणी,सात दिवसांत...

चौकशी अहवालानंतर ग्रामसभेचा दणका…. — रु.९७ हजार ५५१ वसुलीची मागणी,सात दिवसांत रक्कम जमा न केल्यास पोलिस कारवाईची शिफारस…

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी         

     महादवाडी ग्रामपंचायत कार्यालयात ८ जून रोजी प्रशासक भोजराज बापुराव कामडी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा पार पडली.या ग्रामसभेला सुमारे १४० ग्रामस्थ उपस्थित होते.

      ग्राम रोजगार सेवकाविरुद्ध कठोर ठराव घेण्यात आला असून सात दिवसांत रक्कम जमा न केल्यास पोलिस कारवाईची शिफारस करण्यात आली. 

         ग्रामसभेत ग्रामरोजगार सेवक श्री.विलास दादाजी रामटेके यांच्याविरोधातील तक्रारींच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या चौकशी अहवालाचे वाचन करण्यात आले. 

       पंचायत समिती चिमूरमार्फत झालेल्या चौकशीत लाभार्थी योजनांतील निधीच्या गैरव्यवहाराबाबत श्री.रामटेके यांच्याकडून रु.९७ हजार ५५१ इतकी रक्कम वसूलपात्र असल्याचे नमूद करण्यात आले.

           संबंधितांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती.मात्र ते ग्रामसभेला अनुपस्थित राहिल्याने त्यांनी पाठविलेला खुलासा सभेत वाचून दाखविण्यात आला.हा खुलासा ग्रामसभेने सर्वानुमते नामंजूर केला.यावेळी २०१७-१८ मधील चौकशी अहवालाचाही उल्लेख करण्यात आला.

       चर्चेनंतर ग्रामसभेने श्री.रामटेके यांना ग्रामरोजगार सेवक पदावरून कायमस्वरूपी कमी करण्याची शिफारस,सात दिवसांच्या आत वसुलीची रक्कम ग्रामपंचायत खात्यात जमा करण्याची मागणी,तसेच रक्कम न भरल्यास पोलिस कारवाई करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केला.संबंधितांचे थकीत मानधन रोखून ठेवण्याची मागणीही करण्यात आली.

      दरम्यान,श्री.रामटेके यांनी दिलेल्या राजीनाम्याची माहितीही ग्रामसभेत देण्यात आली.ग्रामसभेतील उपस्थित ग्रामस्थांनी हात वर करून सर्व ठरावांना एकमताने मंजुरी दिली.त्यामुळे महादवाडीतील या प्रकरणाने परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.