शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
शंकरपूर, ता. चिमूर (दि. ०६ जून २०२६) : मौजा शंकरपूर येथील बस स्थानक परिसरात चिमूर-कानपा मार्गावरील ११ केव्ही उच्च दाब विद्युत वाहिनीचा तार तुटून तो लो टेन्शन (एल.टी.) लाईनवर पडल्याने मोठ्या प्रमाणात शॉर्टसर्किट होऊन परिसरातील नागरिकांच्या घरांतील विद्युत उपकरणांचे गंभीर नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
या दुर्घटनेमुळे अनेक कुटुंबांचे हजारो ते लाखो रुपयांचे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा तार तुटल्याने एल.टी.लाईनमध्ये अचानक जास्त दाबाचा विद्युत प्रवाह निर्माण झाला.
परिणामी परिसरातील अनेक घरांमधील टीव्ही,फ्रिज,वॉशिंग मशीन,एअर कंडिशनर (एसी), कुलर,पंखे,इन्व्हर्टर,सेट टॉप बॉक्स,संगणक,पाण्याच्या मोटारी तसेच इतर महत्त्वाची विद्युत उपकरणे जळून अथवा निकामी झाली आहेत.
विशेष म्हणजे ही दुर्घटना नागरिकांच्या कोणत्याही निष्काळजीपणामुळे घडलेली नसून विद्युत वितरण व्यवस्थेतील तांत्रिक बिघाड,अपुरी देखभाल किंवा दुर्लक्षामुळे घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नियमित तपासणी आणि वेळेवर देखभाल करण्यात आली असती तर ही गंभीर घटना टाळता आली असती,अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटनांमुळे मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते.
त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
शंकरपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच अशोक ज्ञानेश्वर चौधरी यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने न्याय देण्याची मागणी केली आहे.
त्यांनी पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत….
१) घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
२) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी.
३) नुकसानग्रस्त नागरिकांच्या घरांचा तात्काळ पंचनामा करण्यात यावा.
४) जळालेल्या व खराब झालेल्या सर्व उपकरणांचे तांत्रिक मूल्यांकन करण्यात यावे.
५) शासन नियमांनुसार तातडीने नुकसानभरपाई मंजूर करून वितरित करण्यात यावी.
६) विद्युत वाहिन्यांची सर्वंकष तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी.
७) भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यात याव्यात.
८) या घटनेस कारणीभूत असलेल्या त्रुटींची चौकशी करून दोषींवर प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी.
उपसरपंच अशोक चौधरी यांनी सांगितले की, “शंकरपूर येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.अनेक कुटुंबांनी कष्टाने खरेदी केलेली उपकरणे एका क्षणात निकामी झाली आहेत.
त्यामुळे महावितरणने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करावी.नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पाठपुरावा सुरू ठेवणार आहोत.”
या घटनेमुळे शंकरपूर परिसरातील नागरिकांनीही नुकसानभरपाईबाबत तातडीची कार्यवाही करण्याची मागणी केली असून संबंधित प्रशासन व महावितरण विभागाने त्वरित दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


