Home देशविदेश तथागतांचा बाबासाहेबांनी दिलेला धम्म,आता धर्माच्या वाटेवर…!

तथागतांचा बाबासाहेबांनी दिलेला धम्म,आता धर्माच्या वाटेवर…!

        आत्मा, ईश्वर अंधश्रद्धा आणि कर्मकांड नाकारणारा धम्म आणि स्वीकारणारा धर्म. हा धम्माचा आणि धर्माचा तफावत सांगणारा सिद्धांत.

   पूर्वी धम्म संगिती होत असत, आता धम्म परिषदा होत आहेत. पूर्वीच्या धम्मसंगीतीचे स्वरूप आजपर्यंत या धम्मपरिषदेला कधीच आलेले नाही. 

       धम्मसंगीती आणि धम्म परिषदा यांचे आयोजन कशासाठी केले पाहिजे आणि कशासाठी करत आहेत, हेच मुळी आयोजक विसरतात किंवा मुद्दाम बाजूला करतात हा संशोधनाचा विषय आहे.

        धम्मसंगिती ही भिखू संघाने आयोजित करावयाची असते. ती यासाठी की तथागतांनी निर्मिलेल्या धम्म तत्वज्ञानावर काळानुसार जर धम्मविरोधी शक्तीकडून वेगळा किंवा चुकीचा अन्वयार्थ काढून सर्वसामान्य जनतेत संभ्रम निर्माण होत असेल, विज्ञान आणि विवेकापासून धम्म बाजूला करून धार्मिक अंधश्रद्धा नव्याने मांडत असतील तर त्यांचा तथागतांनी दिलेल्या मूळ तत्वज्ञानाच्या आधारे पुरेपूर पर्दापाश करून धम्मावर आलेली धर्माची काळिमा कायमचे पुसण्याचे कर्तव्य हे प्रत्येक काळात भिखू संघांचे आहे, होते आणि राहिल. यासाठीच धम्म संगितीचे आयोजन कसरण्याचे उद्दिष्ट आहे.

       धम्मपरिषदाचे सुद्धा यासाठीच आयोजन करावयाचे असते. फरक एवढाच की उपासकांनी धम्म परिषदांचे आयोजन करून भिखू संघाला आमंत्रित करून वरील प्रमाणेच उद्दिष्टे प्राप्त करण्याचे कर्तव्य करणे अपेक्षित आहे आणि उपासकांनी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसारच आचरण करून धम्मावर येत राहणारी धार्मिक ग्लानी दूर करून धम्म हा धम्म हा धम्मच कसा राहिल त्याचे रूपांतर धर्मात होणार नाही याची दक्षता भिखू संघाने आणि उपासकांनी सुद्धा घ्यायची असते. तरच धम्म आणि धर्म यात फरक दीसेल. 

      तथागतांनी भविष्यात कायम धम्मावर कुणीच आच आणू शकणार नाही, अशी व्यवस्थाच त्यांनी आपल्या धम्माच्या विविध तत्वज्ञानात केली. परंतू , कोणतेही तत्वज्ञान किंवा नियम हे उपासकांच्या आणि भिखू संघाच्या आचरणाच्या कसोटीच्या प्रमाणावर अवलंबून आहे. जेवढ्या प्रमाणात आचरण असेल तेवढ्याच प्रमाणात शुद्ध धम्म दिसेल.

          मात्र आज 2026 च्या काळात एकतर धम्मसंगिती आणि धम्म परिषदा त्या कसोटीच्या आचरणावर होत नाहीत, आणि झालीच तर त्यात कोणत्याही काळानुसार आलेल्या कलंकांना दूर करण्याचा विचार व्यक्त सुद्धा होत नाहीत.

          हे असं का घडते……?

       कारण, या पृथ्वीतलावर निसर्गनियमाची बाजू घेणारा, मानवतावादाचे कल्याण करणारा, विज्ञानवादी दृष्टी देणारा केवळ तथागतांचाच धम्म आहे. म्हणून सुरुवातीपासूनच या धम्माला विरोध करून विविध प्रकारे संपविण्याचे कारस्थान येथील मनुवादी व्यवस्थेने केले आहे, करत आहेत, करत राहतील. 

     आजचा भिखू संघ आणि उपासक या कुटनीतीला बळी पडुन धर्माच्या वाटेवर जाण्याची शक्यता जास्तीत जास्त निर्माण झाली आहे. याला खतपाणी घालण्याचे काम आपल्याच धम्माचे शासनात असलेले स्लिपरसेल करत आहेत. याचे ताजे उदाहरणच द्यायचे असेल तर भिखू करुणानंद भन्तेचा महाथेरोचा झालेला कार्यक्रम ज्यामध्ये कोट्यावधी रुपयाचा चुराडा झाला. किती उपासकांनी आपल्या घामाच्या कमाईतला विसावा हिस्सा त्यात टाकला ( भ्रष्ट अधिकारी यांच्याच जीवावर हा कार्यक्रम पार पडला….?). आजपर्यंत अनेक भंतेजी महाथेरो झाले, त्यांचे असेच आजपर्यंत कार्यक्रम झालेत का….?

   यापुढे प्रत्येक महाथेरोचे कार्यक्रम असेच होणार का…..?

  होणार नसतील तर आपण भिखू संघ आणि उपासक चुकत आहोत का……?

   हे सर्व प्रश्न आजही आणि भविष्यात सुद्धा अनुत्तरित असतील. 

  तथागतांच्या कार्यकाळात बहुमताने अरहंतप्राप्त भिखूसंघ होता. आज भारतात एक तरी आहे का…..?

      आज धम्मसंगिती आणि धम्म परिषदा यांच्या नावावर केवळ कोट्यावधी रुपये जमा करणे, पत्रावळ्या उठवणे ( ज्या सिद्धार्थाने सहा आठवडे अन्नाचा एक कणही पोटात न टाकता शारीरिक वेदना सहन करून ज्ञानप्राप्ती मिळविली. त्यांच्याच धम्म संगिती व परिषदांच्या आयोजनात पंच पक्वअन्नाची रेलचेल हे कोणत्या तत्वज्ञानात बसते…..?) केवळ राजकीय इव्हेंट आणि देखव्या व्यतिरिक्त काहीही दिसत नाही, हेच वास्तव आहे. 

      आज ज्या कांही धम्मपरिषदेच्या आयोजनांचे पेव फुटलेले आहेत. त्यात एकतर दानपारमिते व्यतिरिक्त धम्म देशना होत नाहीत. कुणीतरी भाडोत्री ( मानधन देऊन ) व्याख्याते येतात. आचरण न करता बडबड करून जातात त्यांना पुरेसा वेळही दिल्या जात नाही. नंतर लाखो रुपये देऊन बोलावलेल्या गायन पार्टीचे कार्यक्रम होतात. जणूकाही या गायन पार्टीसाठीच ह्या परिषदा आयोजित केल्या होत्या असा भास झाल्याशिवाय राहत नाही.

     एखादे प्रा. ऋषिकेश कांबळे सरांसारख्यांच्या व्याख्यानाला मंडपात माणसं दिसत नाहीत, आणि कडूबाई खरात उभ्या राहिल्या की मंडपात पाय ठेवायला जागा उरत नाही…….!

      अशा आमच्या धम्मसांगिती आणि धम्म परिषदा, असा आमचा भिखू संघ आणि उपासक……!

    आज 2026 च्या काळात अनेक धम्म संगिती आणि धम्म परिषदा होत आहेत………

         परंतू , ज्या रोहिणी नदीच्या पाणि वाटपावरून युद्ध होऊ नये म्हणून सिद्धार्थाने गृहत्याग केला…….

    तशा आजच्या धम्मसंगिती आणि धम्म परिषदा अर्थात भिखू संघ आणि उपासक मिळून होणारे जागतिक अणूयुद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प आणि इराणच्या विरोधात रस्त्यावर उतरून आम्हांला युद्ध नको बुद्ध हवा म्हणून संपूर्ण भारत ढवळून काढतील का……?

       संपूर्ण जगाला तसा आदर्श निर्माण करून सगळी अन्वस्त्रे कायमचे नष्ट करायला नऊ देशांना (अमेरिका, इंग्लंड, फ्रांस, चीन,उत्तर कोरिया, रशिया, भारत, पाकिस्तान) भाग पाडतील का…….? 

    तरच तथागतांचा बुद्ध धम्म हा धम्म राहिल……

       अन्यथा हा धम्म कधी धर्म बणून इतर धर्माप्रमाणे विरळून जाईल हें सांगता येत नाही. त्याची सुरुवात झालेली आहे. कारण आपल्यातीलच भिखू आणि उपासक स्लीपरसेल हा धम्म मनुवाद्यांच्या दावणीला बांधण्यासाठी उतावीळ आहेत. 

   म्हणूनच हा धम्म धर्माच्या वाटेवर जात आहे……!!!”

       मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय………

 तसेच संविधान आणि धम्म जागृतीचा कृतिशील लेखक धम्माचा उपासक आणि संविधाननिष्ठ जबाबदार नागरिक…  

       अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, रेणापूरकर,औरंगाबाद, 7875452689