श्वास म्हणजे जीव आणि विश्वास म्हणजेच जीवन होय.कारण श्वास बंद पडला की,जीव गेला असे आपण म्हणतो आणि एखाद्यावरचा विश्वास उडाला की त्यासोबतचा आपला व्यवहारच बंद होतो.
व्यवहार म्हणजेच जीवन होय.दुसऱ्याशी व्यवहार करताना जसा विश्वास महत्त्वाचा आहे,तसाच आपण आपल्याशी कसे वागतो ? कसा व्यवहार करतो ? हेही महत्त्वाचे आहे,विश्वास म्हणजे प्रामाणिकपणा,आपण आपल्याशी प्रामाणिक आहोत की नाही,यावरून पण आपले जीवन कसे आहे ? म्हणजे आपण जिवंत आहोत की मेलेले आहोत हे ठरते.
प्रामाणिकता यावर विश्वास अवलंबून आहे.आपण इतरांशी प्रामाणिक राहणे म्हणजे,व्यवहार करताना जसे बोललो तसे चाललो वागलो का ? दिलेले वचन पळालो का ? केलेला करार ( तोंडी असो की लिखित ) पळालो का?कौटोंबिक नाते निभावले का ? केलेले मित्रत्व टिकविले का? याचे उत्तर होय असणे म्हणजेच आपण प्रामाणिक आहोत,आणि या प्रश्नांचे उत्तर ” नाही ” असेल तर आपण प्रामाणिक नाही,असा त्याचा अर्थ होतो.
एखाद्या आपल्या कार्याचे मेहनतीचे जेंव्हा प्रमाणपत्र मिळते,तेंव्हा आपण विश्वास पात्र आहोत,हे सिद्ध होते.थोडक्यात ” बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ” एव्हढे महत्व प्रामाणिकपणास दिले आहे.प्रामाणिकपणावरच विश्वास अवलंबून आहे,हा नसेल तर विश्वास नसेल.
आपण स्वतःशी सुद्धा प्रामाणिक नसू तर आपला आपल्यावर सुध्दा विश्वास नाही,असा त्याचा अर्थ होतो.उदा.आपण आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी कांहीं संकल्प ,दृढनिश्चय करतो,परंतु त्याप्रमाणे आपण चालत नाही,म्हणजे आपल्याकडून तशी कृती होताना दिसत नाही,यासच आत्मघातकीपणा असे म्हणतात.
म्हणजेच स्वतःच ठरवून ते न करणे ( आळशीपणामुळे,निष्काळजीपणामुळे ) म्हणजेच स्वतःशीच प्रामाणिक न राहणे होय,म्हणजेच स्वतःच स्वतःवर विश्वास नसणे होय.यासच आत्मघातकीपणा म्हणतात,अशी माणसे जीवनात यशस्वी होऊ शकत नाहीत,आणि इतरांना पण यशस्वी होऊ देत नाहीत,म्हणजेच ऐसे आदमी जिना हराम करते है.आणि अशीच माणसे आत्महत्या करतात,आणि अशीच माणसे इतरांचा खून करतात.यांना विश्र्वासघातकी माणसे म्हणतात.
विश्वास नसला की,जीवन जगणे कठीण होते.म्हणून विश्वास आणि जीवन हे वेगळे नव्हेत,जीवनाचे दुसरे नाव म्हणजेच विश्वास होय.विश्वास उडाला की,व्यवहार बंद पडला,व्यवहार बंद पडला म्हणजेच जीवन संपले.
असेच श्वासाचे पण,श्वास बंद पडला की माणूस मेला.म्हणजेच जीव गेला.याचा अर्थ जीव जाणे म्हणजेच दुसरे तिसरे काही नसून श्वास बंद होणे होय.
म्हणूनच श्वास म्हणजेच जीव आणि विश्वास म्हणजेच जीवन होय.


