Home Maharashtra गर्दी नियंत्रण व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कायमस्वरूपी सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी : नगराध्यक्ष प्रशांत...

गर्दी नियंत्रण व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कायमस्वरूपी सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी : नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी….

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून आळंदी शहरासाठी मंजूर करण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा अद्याप कार्यान्वित न झाल्याने भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आषाढी व कार्तिकी वारीदरम्यान लाखो भाविक आळंदीत येत असल्याने गर्दी नियंत्रण व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कायमस्वरूपी सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने बसवावी, अशी मागणी नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

          ८ मे २०२३ रोजी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीसीटीव्ही खरेदी समितीच्या बैठकीत आळंदीतील मंदिर व मंदिर परिसरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली होती. गर्दीच्या काळात संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तीन ड्रोन कॅमेरे खरेदी करण्यासही या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. सध्या नगरपरिषदेच्या वतीने यात्रेच्या कालावधीत सीसीटीव्ही कॅमेरे भाडेतत्त्वावर बसविण्यात येत असून, त्यामुळे दरवर्षी मोठा आर्थिक भार नगरपरिषदेवर पडत आहे. हा खर्च टाळण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून मंजूर असलेली कायमस्वरूपी सीसीटीव्ही यंत्रणा त्वरित कार्यान्वित करण्यात यावी, अशी भूमिका नगरपरिषदेने मांडली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार सुरू असून पुढील पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.

           मुख्याधिकारी माधव खांडेकर दिलेल्या माहितीनुसार, आळंदी शहरासाठी सीसीटीव्ही यंत्रणा, सर्व्हर रूम व ड्रोन कॅमेरे खरेदीस शासनाची मंजुरी मिळालेली आहे. शहर संरक्षण व मंदिर परिसरातील दर्शन रांग व्यवस्थापनासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद असून, सल्लागार कंपनीकडून सुमारे ४ कोटी ९६ लाख रुपयांचे अंदाजपत्रक प्राप्त झाले आहे. निधी आळंदी–देहू तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून उपलब्ध होणार असला तरी, अद्याप शासनस्तरावर तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी प्रलंबित आहे. मंजुरी मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.