दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : देहूफाटा ते चाकण चौक यांना जोडणाऱ्या गरुडस्तंभालगतच्या इंद्रायणी नदीपुलावरील रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरणाचे काम आळंदी नगरपरिषदेने पूर्ण केले आहे. सततची वाहतूक, खड्डे आणि पावसाळ्यातील पाणी साचण्यामुळे त्रस्त झालेल्या या महत्त्वाच्या मार्गावर अखेर सुधारणा झाल्याने नागरिकांसह वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
रविवारी (ता. ८) रात्री दहा वाजल्यापासून सोमवारी (ता. ९) रात्री बारापर्यंत पुलावरील वाहतूक पूर्णतः बंद ठेवून हे काम करण्यात आले. या कालावधीत नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर तसेच नगरसेवकांनी प्रत्यक्ष पाहणी करत कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवले. वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा मार्ग असल्याने डांबरीकरणात दर्जावर भर देण्यात आला.
रस्त्यावर सांडपाणी वाहून येऊन पुन्हा समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी ड्रेनेज व्यवस्थेचीही दुरुस्ती करण्यात आली आहे. दिवसभर वाहतूक बंद राहिल्यामुळे वाहनचालकांची काहीशी गैरसोय झाली असली, तरी काम पूर्ण झाल्याने आता सुरक्षित व सुलभ वाहतुकीचा मार्ग उपलब्ध झाला आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून पुणे–आळंदी रस्त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया पूर्ण करता आली नव्हती. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन आणि नवनिर्वाचित नगरसेवकांनी प्राधान्य देत पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण केले. उर्वरित रस्त्याची कामे निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हाती घेतली जातील, असे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले.



