Home Maharashtra आळंदीत इंद्रायणी स्वच्छतेसाठी १३ फेब्रुवारीला विशेष मोहीम…

आळंदीत इंद्रायणी स्वच्छतेसाठी १३ फेब्रुवारीला विशेष मोहीम…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती व्हावी व नागरिकांमध्ये नदीविषयी आपुलकी निर्माण व्हावी, या उद्देशाने आळंदी नगरपरिषदेच्या वतीने गुरुवारी (ता. १३) सकाळी ८ ते ११ या वेळेत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

          याबाबतचा निर्णय झालेल्या नगरपरिषदेच्या विशेष सभेत मंजूर करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे व मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली.

          इंद्रायणी नदी उगमापासून तुळापूर संगमापर्यंत मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली असून नदीकाठच्या शहर – गावांतील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. यापूर्वी विविध स्तरांवर झालेल्या घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने नदी स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर इंद्रायणी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी व ठोस उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने ही विशेष सभा घेण्यात आली.

         या मोहिमेत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी नगरपरिषद हद्दीतील वारकरी शिक्षण संस्था तसेच सामाजिक संघटना सहभागी होणार असून प्रत्येक नगरसेवक आपल्या १०० सहकाऱ्यांसह स्वच्छता मोहिमेत उतरणार आहे. गोपाळपुरा ते आळंदी नगरपरिषद कार्यालय स्मशानभूमीपर्यंत स्वच्छता करण्यात येणार असून पिंपरी-चिंचवड महापालिका व पीएमआरडीए यांनाही सहभागी होण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.

           दरम्यान, घाट परिसरात महिलांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम उभारणे, नदीत फुले-नारळ-दिवे टाकण्यास व मूर्ती विसर्जनास मनाई, निर्माल्य संकलनासाठी कंटेनर ठेवणे, घाट परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तसेच सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासह विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

         इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आळंदी शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प असल्याचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी सांगितले.