Home Political वडगाव-कोल्हाटी येथे सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांत उत्साह…

वडगाव-कोल्हाटी येथे सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांत उत्साह…

  उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

             औरंगाबाद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकसाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ युवा नेते सुजात आंबेडकर यांची काल बुधवारी (दि. ४) जाहीर सभा वडगाव-कोल्हाटी येथे उत्साहात पार पडली. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

           या सभेत मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, स्थानिक विकासासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सभागृहात घेतले जातात. त्यामुळे या ठिकाणी खऱ्या अर्थाने विकासासाठी काम करणारे आणि वंचित, बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी असणे अत्यंत गरजेचे आहे.

           पुढे ते म्हणाले, वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य दिले जाईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. उत्तम आरोग्य सुविधा, दर्जेदार व सुरक्षित रस्ते, स्वच्छ पिण्याचे पाणी, गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्था तसेच शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

          सध्या सत्ताधारी पक्षांकडून वंचित समाजाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, वंचितांचे प्रश्न मांडणारा आणि त्यावर लढा देणारा पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडी असल्याचे सुजात आंबेडकर यांनी सांगितले.

          विकासासाठी आणि वंचितांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी मतदारांनी एक संधी वंचित बहुजन आघाडीला द्यावी व पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

           या जाहीर सभेला वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा नगरसेवक अमित भुईगळ, औरंगाबाद पश्चिम शहराध्यक्ष अॅड. पंकज बनसोडे, तसेच पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.