Home Political वंचितला एक संधी द्या, गावांचा कायापालट करू; रांजणगावच्या सभेत सुजात आंबेडकरांचे आवाहन…

वंचितला एक संधी द्या, गावांचा कायापालट करू; रांजणगावच्या सभेत सुजात आंबेडकरांचे आवाहन…

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादिका 

रांजणगाव :- स्थानिक विकास, मूलभूत प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी आता वंचित बहुजन आघाडीला एक संधी द्यावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.

            औरंगाबाद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काल मंगळवारी (दि. ३) रांजणगाव येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते.

                  या सभेत बोलताना सुजात आंबेडकर यांनी ग्रामीण भागातील दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांवर लक्ष वेधले. सत्ताधारी पक्षांनी केवळ आश्वासनांची खैरात केली असून प्रत्यक्षात गावांचा विकास झाला नसल्याची टीका त्यांनी केली. वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास गावोगावी बदल कसा घडवून आणला जाईल, याचा सविस्तर विकास आराखडा (ब्लूप्रिंट) त्यांनी यावेळी मांडला.

              सभेला संबोधित करताना सुजात आंबेडकर म्हणाले की, ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाल्याशिवाय खरा विकास होऊ शकत नाही. त्यासाठी प्रत्येक गावात सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

               गरिबांच्या मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे.जिल्हा परिषद शाळांची पुनर्बाधणी करून आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

             यासोबतच स्वच्छ पिण्याचे पाणी, कायमस्वरूपी पाणीपरवठा योजना आणि दर्जेदार रस्त्यांचे जाळे उभारणे हे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

               आपल्या हक्कासाठी लढणारे, गावात राहून गावासाठी काम करणारे प्रतिनिधी निवडून आणण्याची हीच योग्य वेळ आहे, असे ठाम मत व्यक्त करत सुजात आंबेडकर यांनी मतदारांना आवाहन केले. वंचित बहुजन आघाडी ही केवळ सत्ता मिळवण्यासाठी नव्हे, तर सामाजिक न्याय आणि समताधिष्ठित विकासासाठी लढणारी चळवळ असल्याचे त्यांनी सांगितले.

              या जाहीर सभेला परिसरातील नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यावेळी व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अमित भुईगळ, राज्य प्रवक्ते तय्यब जफर, औरंगाबाद पश्चिम जिल्हा निरीक्षक योगेश बन, जावेद कुरैशी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.