Home Social आळंदीत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘एकता दौड’ उत्साहात पार… 

आळंदीत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘एकता दौड’ उत्साहात पार… 

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : आपल्या देशाची अखंडता, एकात्मता आणि राष्ट्रभावनेचे प्रतीक असलेल्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आळंदीत “रन फॉर युनिटी” या एकता दौडीचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. ही दौड पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय‌ अंतर्गत आळंदी पोलीस स्टेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. 

         या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस.नरके म्हणाले, “देशाची एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि देशप्रेम यांचा संदेश देणारी ही एकता दौड हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे. युवकांनी एकजुटीने देशाच्या प्रगतीसाठी काम करावे.”

          एकता दौड चाकण चौक, प्रदक्षिणा मार्ग, जुना पूल, वाय जंक्शन, नवीन पूल, ज्ञानेश्वर विद्यालय या मार्गाने पार पडली. नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्त स्वागत केले. या उपक्रमात डॉक्टर असोसिएशन, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान, संघर्ष प्रतिष्ठान, श्री ज्ञानेश्वर विद्यालय, ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम, ज्ञानसाई विद्यालय तसेच पंचक्रोशीतील विविध शाळांचे विद्यार्थी, सेवाभावी संस्था, तरुण मंडळे आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

          कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी सर्वांना आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने अल्पोपहार व चहापान देऊन गौरविण्यात आले.या वेळी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, डॉ.विकास पाटील, डॉ.सारंग जोशी यांसह पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.