Home Maharashtra रस्त्यासाठी चकलोहारा वासीचा निवडणुकीवर बहिष्कार..‌.

रस्त्यासाठी चकलोहारा वासीचा निवडणुकीवर बहिष्कार..‌.

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी

        चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या चक लोहारा वासीयांनी मागील 40 वर्षापासून मुख्यरस्ता न बनवल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत संपूर्ण गाववासीय बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन चिमूर तहसीलदार यांना देण्यात आले आहे. 

        700 लोक वस्तीचे गाव असून गट ग्रामपंचायत चकजाटेपार अंतर्गत येत आहे.या गावाला शंकरपूर चकजाटेपार डोमा या रस्त्यापासून दीड किलोमीटर आतमध्ये जावे लागते.हा दीड किलोमीटरचा रस्ता अतिशय खराब झालेला आहे.

      इतका खराब झालेला आहे की यारस्त्याने पायदळ जाऊ शकत नाही. दुचाकी वाहन व चार चाकी वाहन दीड किलोमीटरचा अंतर पार करण्यासाठी जवळपास पंधरा ते वीस मिनिट लागत आहे.हा रस्ता 40 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला होता.त्यानंतर अजूनही या रस्त्याकडे कुणीही लक्ष दिलेले नाही.

        या रस्त्याची संपूर्ण गिट्टी उघडलेली असून खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे.या गावातून दुचाकी आणि चार चाकी वाहन जाण्यासाठी गावकऱ्यांनी स्वतःहूनच रस्त्याच्या बाजूने कच्चा रस्ता तयार करून जाणे-येणे सुरू केले आहे.

       या गावाच्या समोरच वाघाई हे श्रद्धास्थान असलेलं मंदिर आहे,डोंगरगाव तलाव आहे.या दोन्ही क्षेत्रात परिसरातील लोक पर्यटनासाठी जात असतात.या रस्त्यामुळे पर्यटक सुद्धा जात नाहीत.

       या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लेखी निवेदन प्रशासन व लोकप्रतिनिधीला देण्यात आलेले आहे.परंतु या रस्त्याची दखल अजून पर्यंत घेण्यात आलेली नाही.त्यामुळे हा दीड किलोमीटरचा रस्ता जोपर्यंत दुरुस्त होणार नाही तोपर्यंत येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे लेखी निवेदन गावातील युवक संदीप ठाकरे,विशाल चौधरी,प्रफुल चौधरी,अतुल चौधरी,प्रवीण चौधरी,प्रमोद चौधरी,दिलीप चौधरी,मारुती चौधरी,देवा मेश्राम यांनी दिलेले आहे.

        यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवक अध्यक्ष शुभम मंडपे व किशोर घोनमोडे उपस्थित होते.