दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
पुणे, ६ ऑक्टोबर २०२५
धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करण्याची दीर्घकालीन मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी या संदर्भात राज्य सरकारकडे मागणी केली आहे. ‘धनगर’ आणि ‘धनगड’ एकच असून केवळ नोंदणीतील चुकांमुळे धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या लाभांपासून दूर ठेवले जात आहे. ही अन्यायकारक परिस्थिती तातडीने दुरुस्त करण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील असून मराठा समाजासाठी जसे त्यांनी सकारात्मक पावले उचलली, तसेच आता धनगर समाजासाठीही ते निश्चितच योग्य निर्णय घेतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या सुमारे ८% आहे. समाजातील साक्षरतेचा दर ६५% असून, तो राज्याच्या सरासरी साक्षरतेपेक्षा (८४%) खालचा आहे. बेरोजगारीचे प्रमाणही धनगर समाजात लक्षणीय असून, सुमारे ४२% युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत.मागील दहा वर्षांत या समाजातील केवळ २.७% विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत, ही आकडेवारी धनगर समाजातील मागासलेपणा दर्शवते.
राज्यातील अनेक भागांमध्ये धनगर समाज हा पशुपालन, शेती व पारंपरिक व्यवसायांवर अवलंबून असून, त्यांचे सामाजिक व आर्थिक स्तर अद्यापही मागासलेले आहे. अनुसूचित जमातींमध्ये समावेश झाल्यास या समाजाला शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेले आरक्षण आणि अन्य सवलती मिळू शकतील. धनगड नावाने अनुसूचित जमातीत नोंद असलेल्या जमातीशीच धनगर समाजाचा मूळ संबंध आहे. पण इंग्रजीत व भारतीय जनगणनेत नावाची चूक झाल्याने आजपर्यंत धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा लाभ मिळालेला नाही, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.
केंद्र सरकारकडे २०१४ पासून या मुद्द्यावर अहवाल, शिफारसी आणि प्रस्ताव सादर झालेले आहेत, परंतु अद्याप अंतिम निर्णय प्रतीक्षेत आहे. राज्य सरकारने मागील काळात धनगर समाजाच्या एसटीमध्ये समावेशासाठी केंद्र सरकारकडे शिफारस पाठवली होती.मात्र, केंद्र सरकारने या संदर्भात आणखी अभ्यास व पुरावे मागितले आहेत.
या प्रक्रियेमुळे निर्णय लांबणीवर पडत असून, समाजात नाराजीचा सूर आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश हा केवळ सामाजिक न्यायाचा नाही तर ऐतिहासिक चुका दुरुस्त करण्याचा प्रश्न आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.



