दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : राज्याच्या विविध भागांमध्ये आलेल्या पूरामुळे मोठे नुकसान झाले असून हजारो कुटुंबे बेघर झाली आहेत. या संकटाच्या काळात श्री क्षेत्र आळंदी देवस्थानने सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीस तब्बल २१ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, ॲड.राजेंद्र उमाप, डॉ.भावार्थ देखने, पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते.
श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन स्थळावरून समाजकार्यासाठी मदतीचा हात पुढे करून आळंदी देवस्थानने पुन्हा एकदा लोकहिताची परंपरा जपली आहे. श्रीक्षेत्र आळंदी हे वारकरी संप्रदायाचे आध्यात्मिक केंद्र असून “माऊलींची माया” ही केवळ वारकऱ्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी मार्गदर्शक ठरते, याची प्रचिती या उदार मदतीतून आली आहे.
या वेळी विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे यांनी सांगितले की, “पूरग्रस्त बांधवांवरील संकट दूर व्हावे, त्यांना नव्याने उभारी मिळावी, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना आहे. समाजाला साथ देणे हे आळंदी देवस्थानचे कर्तव्य आहे आणि ती परंपरा आम्ही कायम ठेवणार आहोत.”
पूरग्रस्त भागांमध्ये पिकांचे, घरांचे, रस्त्यांचे आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावातील जनजीवन विस्कळीत झाले असून शासनाकडून मदतकार्य सुरू आहे. अशा वेळी आळंदी देवस्थानकडून मिळालेला हा निधी पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
आळंदीतील वारकरी, भाविक व नागरिकांमध्ये या निर्णयाचे स्वागत होत असून, “माऊलींची नगरी केवळ आध्यात्मिक नव्हे तर सामाजिक कार्यातही नेहमीच अग्रभागी असते”, अशी भावना व्यक्त होत आहे.



