अबोदनगो चव्हाण..
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
दखल न्यूज भारत..
चिखलदरा तालुक्यातील जलसंधारण लघु पाटबंधारे उपविभाग कार्यालय वाऱ्यावर असल्याचे आज दिसून आले.आज सोमवारला दुपारी सदर कार्यालयात फेरफटका मारला असता आठवड्याचा पहिला दिवस असूनही कार्यालयात कोणताही कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले नाही.
सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा सुस्त कारभार पाहून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस मानला जातो.नागरिकांना शासकीय कामकाज उरकण्यासाठी या दिवशी मोठ्या प्रमाणात कार्यालयांमध्ये गर्दी असते.मात्र वाऱ्यावर असलेल्या उपविभागीय जलसंधारण कार्यालयात याउलट चित्र दिसून आले.
दुपारी चार वाजताच्या सुमारास कार्यालयाचे दरवाजे उघडे असले तरी टेबल खुर्च्या रिकाम्या होत्या.कोणतेही अभियंता,कनिष्ठ अभियंता,कर्मचारी न आढळल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प झाले होते.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की अशा प्रकारची परिस्थिती या कार्यालयात नित्याची झाली आहे.अधिकारी व कर्मचारी आपल्या सोयीस्कर वेळेनुसार कार्यालयात येतात,काही वेळा तर दुपारपर्यंतही या कार्यालयात कोणी दिसत नाही.
त्यामुळे पाणीपुरवठा,जलसंधारणाची कामे,सिंचन प्रकल्पांशी संबंधित फाईल्स अडकून पडतात.शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे,नकाशे,परवानग्या यासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागतात.
एकीकडे शेतकरी सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्ती,बंधाऱ्यांच्या दुरुस्ती,जलसंधारण योजनांच्या अंमलबजावणीसाठी सतत मागण्या करत आहेत.पण दुसरीकडे कार्यालयातील अशा शिथिल कार्यपद्धतीमुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की अधिकारी व कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहून कामकाज पार पाडले पाहिजे,अन्यथा त्यांची तक्रार नोंदवली जाईल असा इशारा दिला आहे.
सरकारी नियमांनुसार कार्यालयीन वेळ सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच असी असतो.मात्र सदर कार्यालय वाऱ्यावर असल्याचे चित्र पाहता नियमांचे पालन होत नसल्याचे स्पष्ट होते.
जबाबदार अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.या घटनेनंतर नागरिकांमध्ये नाराजी असून सार्वजनिक हिताच्या दृष्टीने चालणारी कार्यालये जर बंद असतील तर मग शेतकऱ्याला न्याय कुठे मिळणार?असा सवाल उपस्थित केला जात आहे.



