मानवी संस्कार घडवून माणूसकी प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य शिक्षणात असते, म्हणून शिक्षण आवश्यक आहे. त्यामुळे माणसाच्या जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. किंबहुना ते कोणीच नाकारु शकत नाही. ज्ञान साधणेने मनुष्य प्राणी विनयशील व चारित्र्यशील बनण्यास मदत होते ‘विद्या विनयेने शोभते’ असे जे म्हटले आहे ते त्यामुळेच! शिक्षणामुळे माणूस बदलतो, तो समाजाचा घटक असल्याने त्याच्या बदलाचा परिणाम त्याच्याबरोबर परिवारासह समाजावर होतो. म्हणून शिक्षण हे समाज परिवर्तनाचे मूलभूत माध्यम आहे असे मानले जाते.
शिक्षणासंबधीचा पंचपदी सिद्धांत मांडणारे हर्बट असे म्हणतात, शिक्षण म्हणजे चारित्र्यशीलता होय, ‘तर टागोरांनी म्हटले आहे, ‘जे माणूस घडवते ते शिक्षण! शिक्षण म्हणजे सुप्त शक्तिचे प्रगटीकरण’ असे एडिसन यांचे स्पष्टीकरण आहे, तर कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात, माणसाला स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर, निस्वार्थी आणि समाजाभिमुख बनविते ते खरे शिक्षण होय. ‘शिक्षण म्हणजे पूर्णत्वाचा अविष्कार होय’, असे स्वामी विवेकानंदाचे मत आहे.
जोतीराव फुले यांचे कार्य तर चौफेर आहे. विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली, नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शुद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले, असे त्यांनी म्हटले. राजर्षी शाहू यांनी फुले दांपत्याकडून प्रेरणा घेऊन शिक्षणासंबधीचे संस्थानात म्हत्वाचे निर्णय घेतले. १८८२ मध्ये फुल्यांनी पाहिलेले ‘मोफत आणि सक्तीच्या शिक्षणासंबधीचे’ स्वप्न शाहुंनी आपल्या संस्थानात खरे करुन दाखविले. राजर्षी शाहू असे म्हणायचे, शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नत्ती झाली नाही असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या उत्तम व मुत्सदी लढवय्ये वीर शिक्षणाशिवाय कधीच निपजणार नाहीत, म्हणून सक्तीच्या व मोफत शिक्षणाची राष्ट्राला गरज आहे असे म्हटले होते!
जोतीराव फुले व राजर्षी शाहुंचे विचार घेऊनच पुढे डॉ.आंबेडकर यांनी भारतीय संविधानात शिक्षणाला म्हत्वाचे स्थान देऊन स्पर्धेच्या व विज्ञानाच्या युगात अज्ञानाला गाडून टाकण्याचे धैर्य दाखविले! आता मला सांगा, ज्यांच्या नावाने आज शिक्षकदिन साजरा होतो आहे त्या सर्वपल्लींचे यात कसले योगदान आहे का? मग याबाबत एकही शिक्षक का बोलत नाही? का आवाज उठवत नाही? का चिकित्सा करत नाही? बेमालूमपणे शासनाने लादलेला हा शिक्षक दिन हतबल अवस्थेत का सहन करतोय?
असो! न बोलणा-या शिक्षकांच्याकडून खराखुरा इतिहास पुढे येईल आणि समाज सुधारेल, याची खात्री कोणत्या आधारावर मिळेल. का हे सारेच अधांतरी असेल. एक विचित्र परिस्थिती!
असं म्हणतात, एक डॉक्टर चुकला तर एक पेशंट मरेल. एक इंजिनियर चुकला तर एक पूल पडेल, एक बँकर चूकला तर एक घोटाळा होईल! पण एक शिक्षक चुकला तर अवघी पिढी बरबाद होईल!
त्यामुळे शिक्षकहो चूकू नका. हतबल होऊ नका. ठाम रहा आणि छातीठोकपणे हिंमत करून सांगा महाराष्ट्र शिकला तो जोतीराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्यामुळे. तेव्हा हेच फुले दांम्पत्य शिक्षक दिनाचे खरे हक्कदार आहेत!


