शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर तालुकांर्गत मौजा आंबोली चौक परिसरात सुरू असलेल्या तथाकथित गोरक्षणातून गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार उघडकीस आला आहे.
मुक्या जनावरांची नीट व्यवस्था नसल्याने गेल्या काही दिवसांत अनेक जनावरे आजाराने मृत्यूमुखी पडली.

मृत जनावरांना दफन न करता उघड्यावरच फेकण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार,या गोरक्षणात तीस ते चाळीस मोकाट जनावरे ठेवण्यात आली आहेत.
परंतु,त्या जनावरांसंबंधाने आवश्यक सोयी-सुविधांचा पूर्णतः अभाव आहे.बसण्यासाठी योग्य जागा नसल्याने जनावरे दिवसभर उभी राहतात.
पाणी,चारा व स्वच्छतेची सोय अपुरी असल्याने ती आजारी पडतात आणि मृत्यूमुखी पडतात.मृत जनावरांना दफन करण्याची कोणतीही सोय नसल्याने ती परिसरात उघड्यावर टाकल्याने वातावरण अस्वच्छ झाले आहे.
विशेष म्हणजे,या गोरक्षणाची कुठलीही अधिकृत नोंदणी ग्रामपंचायत किंवा संबंधित विभागाकडे नाही.
गोरक्षण कोणाच्या व्यवस्थापनाखाली चालते,याबाबतही कोणालाच ठोस माहिती नाही.गोरक्षणाचा बोर्डसुद्धा लावलेला नाही.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मृतीभूमीत अशा प्रकारे जनावरांवर होणाऱ्या अन्यायामुळे नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
नागरिकांनी या प्रकरणात आरोग्य विभागाने तसेच पशुसंवर्धन विभागाने हस्तक्षेप करून तातडीने दखल घ्यावी,अशी मागणी केली असून प्रशासनाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणी चिचाळा शास्त्रीचे सरपंच अरविंद राऊत यांनीही चिंता व्यक्त केली असून,”गोरक्षणाबाबत ग्रामपंचायतीकडे कोणतीही नोंदणी नाही. या गोरक्षणात मृत पावलेले जनावरे उघड्यावर फेकली जात असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे.त्याचा परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.



