ऋषी सहारे
संपादक
ब्रम्हपुरी :- गुरुदेव सेवा मंडळाला दान केलेल्या जागेवरील खासदार निधीतून प्रार्थना करण्याकरिता समाज भवनाचे कामाकरीता निधी प्राप्त झाले मात्र बाहेर गावातील व्यक्तीने त्या जागेवर आपले अधिकार दाखवून बांधकाम थांबविले.त्यामुळे गुरुदेव भक्तांच्या भावना दुखावल्या अर्धवट समाज भवनाचे बांधकाम पूर्ण व्हावे व अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावे या मागणीसाठी हळदा येथील गुरुदेव भक्तांनी आज तहसील कार्यालयावर व पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक ब्रम्हपुरी यांना निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त की, ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथे अनेक वर्षापासून गुरुदेव सेवा मंडळ असून किमान ५० ते ६० गुरुदेव सेवक परिवार आहेत.ते सर्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारसरणीशी प्रेरित होऊन दररोज सकाळ सायंकाळ प्रार्थना करतात.त्याच बरोबर अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात.
याच कार्याने प्रेरित होऊन गावातील प्रमोद राऊत, सुदाम राऊत यांनी राहणार हळदा यांनी आई वडिलांच्या स्मुर्ती निमित्त ४० बाय ३० एकूण १२०० चौ. मीटर जागा गुरुदेव सेवा मंडळास दान दिली तसे कागद पत्रे उपलब्ध आहेत ती जागा ग्रामपंचायत नी गुरुदेव सेवा मंडळाच्या नावे केली आहे.त्याच जागेवर माजी खासदार महोदय यांच्या स्थानिक निधीतून दहा लक्ष रुपयाचा निधी समाज भवना करिता मंजूर झाले. व समाज भवनाचे बांधकाम ग्रामपंचायत मार्फत सुरू होते.
मात्र प्रभाकर पांडुरंग धुडसे राह. पालेबारसा ता.सावली जिल्हा चंद्रपूर या बाहेर गावातील व्यक्तीने बांधकाम विभागास अर्ज करून सदर बांधकाम बंद पाडले.
बांधकाम विभागाने कोणतीही चौकशी न करता सदर बांधकाम बंद करण्याचे पत्र दिले.त्यामुळे गुरुदेव भक्तांच्या भावना दुखावल्या बंद पडलेले काम सुरू करावे यासाठी अनेक वेळा तहसील कार्यालय,बांधकाम विभाग यांना विनंती अर्ज केले मात्र त्यांनी लक्ष दिले नाही.
म्हणून नाईलाजास्तव आज दिनांक२० मार्च २०२५ ला बंद पडलेले काम सुरू करावे या मागणीसाठी रेल्वे फाटक ते तहसील कार्यालय, व पोलीस स्टेशन पायी गुरुदेव भक्तांनी दिंडी भजन काढीत तहसील कार्यालयावर मोर्चाची धडक दिली व आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. तहसील कार्यालय निवेदन देऊन दिंडी भजन सहित मोर्चा आगेकूच करीत पोलीस स्टेशन वर मोर्चा नेऊन पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
मोर्चात गावातील अनेक पुरुष,महिला बाल गोपाल गुरुदेव भक्त मोर्चात सहभाग घेतला.निवेदन देताना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.विनोद झोडगे, खोरीप नेते प्रशांत डांगे,सामाजिक कार्यकर्ते रेवणनाथ चिमुरकर सर,सुदाम राऊत,भाग्यवान चीमुरकर,देवराव डोमळे, सचिन बदन, राकेश ठाकरे,महादेव भोयर,रावजी म्हस्के,पांडुरंग राऊत, नामदेव चट्टे,आत्माराम कोवे,रेखा चंदन खेडे,लीना मस्के,मीनाक्षी पेटकर, रितिका कामडी,रुपाली चीमुरकर आदी गुरुदेवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



