पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे यांचे हस्ते ‘गोंडवानाचा महायोद्धा क्रांतिवीर बाबुराव शेडमाके’ पुस्तकाचे विमोचन.

 

ऋषी सहारे

संपादक

 

गडचिरोली:- 

साहित्यिक व रसिक यांच्या प्रचंड उपस्थितीत झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्लारपुरे लिखित गोंडवानाचा महायोद्धा क्रांतिवीर बाबुराव शेडमाके या नाटकाच्या पुस्तकाचे विमोचन प्रा. विलास निंबोरकर यांचे सभागृहात पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांचे हस्ते थाटात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्यसमीक्षक प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर होते, तर प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम यांनी पुस्तकावर भाष्य केले. 

        याप्रसंगी बोलताना “क्रांतिवीरांचे कार्य जगण्याची प्रेरणा देते. त्यांचे कार्य चुडाराम बल्हारपुरे यांनी नाटकाचे रूपाने अधोरेखित केले, ही अत्यंत मौलिक घटना आहे.” असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांनी केले. सोबतच त्यांनी जुन्या स्मृतींनाही उजाळा दिला.

        प्रसंगाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळावर नियुक्ती झाल्याबाबत डॉ. परशुराम खुणे व प्रा. सदानंद बोरकर यांचा, पहिले आदिवासी महिला संमेलन यशस्वी करून गडचिरोली जिल्ह्याची मान उंचावल्याबाबत आदिवासी साहित्यिका कुसुमताई आलाम यांचा, पुस्तकास प्रस्तावना व भाष्य केल्याबाबत प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर व प्रा. जनबंधू मेश्राम यांचा आणि नुकतेच सेवानिवृत्त झालेले झाडीपट्टीतील विनोदी कलावंत प्रा. शेखर डोंगरे यांचा तसेच ज्येष्ठ कलावंत पुरुषोत्तम रोहनकर यांचा नाट्यश्री च्या वतीने शाल, श्रीफळ, पुस्तक, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

        कार्यक्रमाचे सुरुवातीस दिवंगत सुप्रसिद्ध साहित्यिक किशोर सानप, झाडीपट्टीतील दिवंगत कलावंत नृत्यांगना पूजा बनसोड, नृत्यांगना अनु नैताम, सुप्रसिद्ध गायक मोतीराम चौधरी व भरत राजगडे यांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

         विशेष अतिथी म्हणून प्रा. एस. एन. पठाण, प्रा. सदानंद बोरकर, प्रा. नरेंद्र आरेकर, प्रा. शेखर डोंगरे ( नाट्यकलावंत), प्रा् श्रीकांत कुतरमारे , प्रा. डॉ. सविता सादमवार व प्रसिद्ध आदिवासी साहित्यिका कुसुमताई आलाम उपस्थित होत्या. याप्रसंगी झाडीपट्टीतील संगीतकार विठ्ठल खानोरकर, गायक दिवाकर बारसागडे, केवळराम बगमारे, राज ठाकूर व शहनवाज यांनी ‘क्रांतिवीर बाबुराव शेडमाके’ व ‘बिरसा मुंडा’ या नाटकातील नाट्यगीते सादर करून कार्यक्रमात चैतन्य निर्माण करून रंगत आणली.

        यानिमित्ताने झाडीपट्टीतील निवडक ४० कवींचे कवीसंमेलनही घेण्यात आले. त्यात चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यातील कवी सहभागी झाले होते. सर्व सहभागी कवींना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन प्राध्यापक यादव गहाणे यांनी तर, कवी संमेलनाचे संचालन योगेश गोहने यांनी केले. प्रास्ताविक दिलीप मेश्राम यांनी, तर आभार प्रदर्शन दादाजी चुधरी यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा. अरुण बुरे, वसंत चापले, गुणवंत शेंडे व चुडाराम बल्हारपुरे यांनी मेहनत घेतली. सर्व अतिथी, कविमित्र व उपस्थितांना सोनू आलाम,व नाट्यश्री च्या वतीने झाडांची रोपे देऊन, पर्यावरणाचे रक्षण व समृद्धीचा संदेश देऊन सत्कार करण्यात आला.