Home देशविदेश अभ्यास समस्यांचा आणि शोध त्यांच्या मुळाचा…

अभ्यास समस्यांचा आणि शोध त्यांच्या मुळाचा…

        जगात देशात गावात कुटुंबात माणसात समस्या एक नाही,अनेक समस्या आहेत. गरीबांच्या तर खूपच समस्या आहेत,मध्यम वर्गीयांच्या पण समस्या आहेत,श्रीमंतांच्या समस्या तर गुंतागुंतीच्याच आहेत.समस्यांचे शारीरिक,भौतिक,मानसिक असे तीन प्रकार आहेत.यांना व्याधी पण म्हणतात.आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक मानसिक असे त्यांचे वर्गीकरण करता येईल.

       समाजातील समस्या पाहून ऐकून,पेपर व पुस्तकात वाचून किंवा स्वतः अनुभवातून समजतात किंवा ओळखीच्या होतात.

        ज्यांचे मन कठोर आहे,किंवा ज्यांना मनच नाही,म्हणजेच ज्यांना संवेदनाच नाहीत,जे जडजीव आहेत,अशा लोकांना अशा समस्यांचे काहीच वाटत नाही,त्याकडे दुर्लक्ष करतात.आणि काही लोक या समस्याचे कारण म्हणजे त्यांचे पूर्वकर्माचे फळ किंवा दैव किंवा देवाचा कोप असे समजून चालतात,त्यासाठी त्यांना काहीच करावेसे वाटत नाही.

           दुखितांचे दुःख नाहीसे झाले पाहिजे,असे ज्यांना वाटते,म्हणजेच ज्याला मन आहे,आणि ते संवेदनशील आहे,म्हणजे हळवे आहे,असे लोक समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक आणि मानसिक समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करतात.त्यांचा अभ्यास करतात.आणि कामाला लागतात.यात मोठ्या प्रमाणात जे सामाजिक कार्य करतात,त्यांना ज्येष्ट आणि श्रेष्ठ कार्यकर्ते ,आणि छोट्या स्वरूपाचे कार्य करणाऱ्यास सामाजिक कार्यकर्ता म्हणतात.

             समस्यांची जाणीव होणे,म्हणजेच संवेदनशीलता होय,जाणीव होऊन काम करणे,आणि समस्यांचा अभ्यास करून कार्य करणे यात फरक आहे.समस्यांचा अभ्यास करणे म्हणजे त्यांचे स्वरूप जाणणे होय.पण समस्यांचे मूळ शोधणे म्हणजे त्या समस्यांची कारणे शोधून ती कारणे दूर करण्याचा प्रयत्न करणे ,यास पण समाजकार्यच म्हणतात.

         उदा.पावसामुळे पूर आला, अती वृष्टी झाली,त्यामुळे माणसांच्या जीविताची आणि मालमत्तेची ( घर शेत पिके ) नुकसान झाले.हा झाला अभ्यास.पण अतिवृष्टी का होते ? त्याची कारणे शोधणे,हा पण अभ्यासच होय.पण या कारणाचे मुळ शोधणे म्हणजेच संशोधन किंवा शोध होय.

       उदा.2 रे — समाजात गरीबी आहे,गरिबीमुळे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या मूलभूत ( प्राथमिक ) गरजा निर्माण झालेल्या आहेत.हा झाला अभ्यास,परंतु या गरिबीमुळे जर या समस्या निर्माण झाल्या असतील तर गरिबीची कारणे काय ? भौतिक आणि मानसिक कारणे असतील तर ती का निर्माण झाली ,? असा अभ्यास करणे ,म्हणजे शोध संशोधन.आणि जेंव्हा कारणे लक्षात घेऊन,त्या कारणांचे निराकरण करण्यासाठीचे प्रयत्न म्हणजे पण समाज कार्य होय.

      आता आपण समाजकार्याचे प्रकार पाहू या.याचे माझ्या मते तीन प्रकार होतात.1समस्या सोडविणे 2.समस्यावर तात्पुरते उपाय ( प्रासंगिक) करणे 3.कायमचा उपाय करणे.

      संवेदनशील कार्यकर्ते हे तात्पुरते उपाय करतात आणि विचारशील कार्यकर्ते हे समस्यांवरच घाव घालण्याचे आणि त्याला पर्याय देण्याचे पण कार्य करतात.थोडक्यात जे कार्यकर्ते भावनाशील होऊन कार्य करतात ते दुःखावर मलमपट्टी करून फक्त त्याची दाहकता कमी करतात.पण रोग बरा करीत नाहीत.तात्पुरता उपाय म्हणजे दुःखाचे ,समस्याचे निराकरण नव्हे.

         उदा.गरिबाना अन्नदान,वस्त्रदान,तापुरता निवारा आसरा,शिक्षण दान,आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून देणे हे झाले तात्पुरते आणि परावलंबी उपाय.आत्मनिर्भर उपाय स्वावलंबी उपाय म्हणजेच समस्यांचे निराकरण होय.यावरून सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांचे सुधारक वादी , परिवर्तनवादी आणि क्रांतिकारी असे तीन प्रकार करता येईल.वादी याचा अर्थ आग्रही,दुराग्रही नव्हे.विचाराचे ,तत्वाचे पक्के,निष्ठावंत.काही कार्यकर्त्यांना समस्यावर तात्पुरते उपायच महत्वाचे वाटतात.त्यांना परिवर्तनाची गरज ही दूरची गोष्ट वाटते,क्रांती तर अध्यक्यच वाटते.

         परिवर्तनवादी कार्यकर्ते हे लोकांच्या समस्यावर काम करतात,पण ते करीत असताना लोकांना या समस्यांची कारणे याची जाणीव करून देत त्या समस्यांचे कारणावर उपाय शोधण्यासाठी लोकांना प्रवृत् करतात.याचा अर्थ परिवर्तनवादी कार्यकर्ते हे जाणीवजागृतीचे काम करतात.आणि क्रांतिकारी कार्यकर्ते हे सर्व समस्यांचा अभ्यास करून,त्या समस्यांची कारणे शोधून माणसाची अवस्था ही ज्या व्यवस्थेमुळे (सामाजिक आर्थिक ) निर्माण झाली,ती व्यवस्थाच जो पर्यंत बदलणार नाही,तो पर्यंत गरीब असो,मध्यम असो की श्रीमंत यांच्या समस्या ह्या ,ज्या व्यवस्थेमुळे निर्माण झाल्या आहेत,ती व्यवस्थाच बदलली पाहिजे,या ठाम आत्मविश्वासाने,निर्धाराने जीवाची ,कुटुंबाची,आयुष्याची पर्वा न करता जे कार्यकर्ते अहोरात्र झटतात,बेभान होऊन कार्य करतात,त्यांना क्रांतिकारी क्रांतिवादी सामाजिक कार्यकर्ते म्हणतात.

       थोडक्यात सुधारणावादी,परिवर्तनवादी आणि क्रांतिकारी असे कार्यकर्त्यांचे आणि समाजकार्याचे तीन प्रकार आहेत.

      सारांश,आजचा चिंतनाचा विषय हा की, जगात संवेदनाहीन माणसांचीच संख्या जास्त आहे,आणि जे धार्मिक आणि अध्यात्मिक मोठ्या संख्येनी आहेत,ते माणसांच्या आणि देशाच्या ज्या भौतिक सामाजिक मानसिक समस्या आहेत,त्या केवळ देवामुळे आणि दैवामुळे असे समजून एक तर कपाळावर हात मारून रडत बसणारे किंवा देवाचा धावा करणारे लोक आहेत.आणि कमी संखेने जे आहेत,म्हणजे जे संवेदनशील आहेत.समाजाच्या,देशाच्या,माणसांच्या समस्या पाहून त्यांना दया येते,कळवला येतो,ते सामाजिक कार्यकर्ते त्यात मन भावनांच्या प्रभावाने काम करणारे आणि काही आहेत जे बुद्धी ने काम करणारे,आणि काही मन आणि बुद्धीने पण कार्य करणारे कार्यकर्ते.

     .म्हणून कार्यकर्त्यांना मनासोबत बुद्धीचा वापर केला तर ते कार्य परिपूर्ण होते,अन्यथा ते अर्धवटच राहून जाते.असा शोध आणि बोध या लेखाद्वारे करण्याचा हा प्रयत्न.धन्यवाद.

      लेखक : दत्ता तुमवाड

         सत्यशोधक समाज नांदेड

  दिनांक: 27सप्टेंबर 2025.फोन : 9420912209..