Home Maharashtra ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन…

ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

           पुणे : ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. नवी मुंबईती नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी तीननंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात येईल. 

           बाबा महाराज सातारकर यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं. रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकर यांचं व्रत होतं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं. दरम्यान, यावर्षीच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचं निधन झालं होतं. त्यानंतर 8 महिन्यानंतर बाबा महाराज सातारकर यांचीही प्राणज्योत मालवली. बाबा महाराज सातारकर यांनी 1983 पासून संतांच्या गावी दरवर्षी कीर्तन सप्ताह आयोजन करण्याची परंपरा सुरू केली. यात त्यांनी भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर इत्यादी ठिकाणी कीर्तन सप्ताहांचं आयोजन केलं. त्यांनी जनसेवा करण्यासाठी चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेचीही स्थापना केली. या माध्यमातून भाविकांना वैद्यकीय सुविधाही पुरवण्यात येते. 

बाबा महाराज सातारकर यांचा परीचय

            नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी, इ.स. १९३६ रोजी सातार्‍याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला. त्यांनी वकिलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आली होती. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे. प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांनी या फडाची सुरुवात केली. हरिविजय, भक्तिविजय या ग्रंथांवर ते प्रवचने करत असत. त्यांच्यानंतर त्यांचे दुसरे पुत्र अप्पामहाराज सातारकर यांनी फडाची धुरा सांभाळली. इ.स. १९६२ साली अप्पामहाराजांचे निधन झाल्यावर अप्पामहाराजांचे पुतणे – नीळकंठ ज्ञानेश्वरांनी, अर्थात बाबामहाराज सातारकरांनी फडाची परंपरा सांभाळली.