Home Maharashtra चुलत्याकडूनच सुपारी,विक्रम लाड अटकेत,पाच संशयित ताब्यात…

चुलत्याकडूनच सुपारी,विक्रम लाड अटकेत,पाच संशयित ताब्यात…

  अबोदनगो चव्हाण

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

       दखल न्युज भारत 

अमरावती : बडनेरा परिसर हादरवून टाकणाऱ्या पेट्रोलपंप संचालक मिलिंद मुरलीधर लाड (४६, जुनीबस्ती बडनेरा) हत्याकांडामागे कौटुंबिक वादाचे धागेदोरे मिळाले असून, पोलिसांच्या तपासात मृतकाचा चुलत भाऊ विक्रम लाडच या खुनामागचा सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे. विक्रमनेच सुपारी देऊन हा खून घडवून आणला. या प्रकरणी विक्रमसह पाच जण पोलिसांच्या ताब्यात असून, आणखी आरोपींचा समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्राणघातक हल्ला कसा घडला?

         बुधवार २४ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास मिलिंद लाड आपल्या कर्मचारी चंदन मोरेसोबत पेट्रोलपंप बंद करून दुपहिया वाहनाने (एमएच २७/सीजे ९६९३) घरी जात होते. त्याचवेळी अंजनगाव बारी मार्गावरील हॉटेल रानमालजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांना थांबवले. चंदन मोरे याला मारहाण करून पळवून लावण्यात आले. त्यानंतर हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी मिलिंद लाड यांच्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र रक्तस्राव जास्त झाल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

घटनास्थळावरील तपास व सापडलेले पुरावे…

        घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील चव्हाण, उपायुक्त गणेश शिंदे, एसीपी कैलास पुंडकर तसेच गुन्हा शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनास्थळावरून पोलिसांना रक्ताने माखलेले दोन चाकू सापडले, जे हल्लेखोरांनी घाईत टाकून दिले होते.

सीसीटीव्ही फुटेजमुळे संशयितांचा शोध…

         परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केल्यानंतर दोन युवक दुचाकी वाहनावरून जाताना आढळले. पोलिसांच्या अंदाजानुसार चार जण या हल्ल्यात सामील होते—दोन जण पेट्रोलपंपावरूनच मागोवा घेत होते, तर दोन जण हॉटेल रानमालजवळ अंधारात थांबले होते. या आधारे तातडीने हालचाल करून बडनेरा पोलिस व गुन्हा शाखेच्या पथकाने तीन संशयितांना पहाटे ५.३० वाजता ताब्यात घेतले. यामध्ये दोन जण अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले.

प्रत्यक्षदर्शींचे निवेदन…

        मृतकासोबत असलेला कर्मचारी चंदन मोरे हा हल्ल्याच्या वेळी पळून जाऊन जवळच्या हॉटेलमध्ये शिरला. त्याने तिथल्या संचालकाला घटना सांगितल्यावर हॉटेल मालक बाहेर आला आणि त्याने स्वतःच्या डोळ्यांनी मिलिंदवर होत असलेला हल्ला पाहिला. त्यामुळे पोलिसांकडे या दोघांचे निवेदन महत्त्वाचे पुरावे ठरत आहेत. चंदन मोरे हा स्थानिक माजी नगरसेविकेचा दीर असल्याचीही माहिती पुढे आली आहे.

कौटुंबिक वादातून खून…

       मिलिंद लाड यांचा पेट्रोलपंप हा मूळतः त्यांचे वडील मुरलीधर लाड आणि काका राजू लाड यांनी मिळून उभारला होता. नंतर प्रॉपर्टीच्या वादातून हा पंप मिलिंदच्या ताब्यात गेला. या कारणावरून त्यांचा चुलत भाऊ विक्रम लाड याच्याशी दीर्घकाळ वाद होता. चर्चेतून हा वाद मिटल्याचे सांगितले जात होते, मात्र पोलिस तपासात विक्रमनेच या खुनाची सुपारी दिल्याचे उघड झाले. त्यामुळे प्रॉपर्टी वादच या हत्येच्या मुळाशी असल्याचे दिसून येते.

        सध्या विक्रम लाडसह पाच जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची सखोल चौकशी सुरू असून त्यांनी अद्याप गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. हत्येमागे आणखी कोणी सामील आहे का, हे तपासले जात आहे. या घटनेने बडनेरा शहरासह अमरावतीत एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.