रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
यंदाचे वर्षी पावसाने शेतकऱ्यांना चांगलेच हैराण करून सोडले आहे. मागील पंधरा दिवसांत चिमूर तालुक्यात सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन व कापूस पीक पूर्णतः उध्वस्त झाले असून शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले होते.
अशातच या क्षेत्रातील आमदार कीर्तीकुमार (बंटी) भांगडिया यांनी शेतकऱ्यांच्या पीक नुकसाना बाबत शासन स्तरावर पाठपुरावा केल्याने त्यांच्या आग्रहास्तव शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याकरिता आज दि.२४ सप्टेंबर २०२५ रोजी राज्याचे आदिवासी विकास विभाग मंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री अशोक उईके, वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्हा सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, चिमूर विधानसभा क्षेत्र आमदार कीर्तीकुमार (बंटी) भांगडिया,यांच्या प्रमुख उपस्थितीत चिमूर तालुक्यातील भिसी, वाहनगाव, बोथली, खाणगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पीक नुकसानीची पाहणी करण्यात आली.
आमचे सरकार शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभे आहे. असे सकारात्मक आश्वासन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आले. यावेळी प्रामुख्याने चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा, चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन,जिल्हा परिषद चंद्रपूर मुख्याधिकारी पुलकित सिंग, जिल्हा कृषी अधिकारी शशांक तोटावार, यांचेसह सर्व विभागाचे अधिकारी, चिमूर तालुका भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




