Home Maharashtra शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर भारतीय किसान संघ आक्रमक, साकोली तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…

शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर भारतीय किसान संघ आक्रमक, साकोली तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : पावसाने प्रचंड प्रमाणात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची प्रचंड आर्थिक अडचण झाली आहे. पिकांचे नुकसान, विमा योजना, वन्य प्राण्यांचा त्रास आणि शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी भारतीय किसान संघाच्या वतीने साकोली तहसीलदारांनमार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाध्यक्ष सुरे़द्र पांडे यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा मंत्री दिनेश कापगते यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

      या निवेदनात खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत…

 १) संपूर्ण विदर्भात ओला दुष्काळ…

         अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचे खूप नुकसान झाले आहे. व त्यानंतर खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे विदर्भातील सर्व तालुक्यात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. म्हणून संपूर्ण विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करून दिवाळीपूर्वी सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी व ती सन 2023 च्या परिपत्रकानुसार 13600 प्रमाणे तीन हेक्टर पर्यंत मर्यादा असावी.

२) पिकांची केंद्राच्या हमीभावाप्रमाणे खरेदी…

        कापूस,सोयाबीन, धान व मका या पिकांची केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावाने 15 ऑक्टोबर ते 31 मार्च पर्यंत खरेदी करण्यात यावी व नोंदणीची प्रक्रिया ही सहज व सुलभ शेतकऱ्यांना करता यावी अशा प्रकारची असावी. तसेच सोयाबीन व कापसाच्या आद्रतेची अट ही १०% वरून १५% करण्यात यावी व महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाने जे दर केंद्र शासनाकडे पाठवले त्या दराप्रमाणे शेतकऱ्यांना बोनस देण्यात यावे. व खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्यात यावी. 

३) पिक विमा…

       शेतकऱ्यांचे मागील तीन वर्षातील पिक विमा नुकसान भरपाई दिलेली नाही आहे ती त्वरित दिवाळीपूर्वी देण्यात यावी. व पीक विम्याची निकष पूर्वीप्रमाणे करण्यात यावी तसेच सर्व तालुक्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिक विमा संदर्भात पीक विमा तक्रार निराकरण कक्षाची स्थापना करण्यात यावी व ते निकाली काढण्यात यावे. 

४) महावितरणचा गलथान कारभार…

       मागील त्याला विहीर या मनरेगाच्या योजनेमुळे विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यात विहिरींची संख्या खूप वाढली आहे नवीन वीज कनेक्शन देताना मागेल त्याला सौर पंप या योजनेमध्ये शेतकऱ्यांना एक ते दोन वर्ष कनेक्शन मिळत नाही आहे तरी आपण विशेष करून विदर्भाकडे लक्ष द्यावे व शेतकऱ्यांना अर्ज केल्यापासून एक महिन्यात वीज कनेक्शन मिळावे व तसे न झाल्यास वीज कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. शेतकऱ्यांना रब्बी हंगामात ओलीत करण्यासाठी उच्च दाबाचा सुरळीत दिवसा दहा तास विद्युत पुरवठा द्यावा.

५) ई पिक पाहणी…

       ई पीक पाहणीची जाचक अटी शिथिल करण्यात यावी. व ईपीक पाहणी पूर्वीच्या प्रमाणे करण्यात यावी तसेच ई पिक पाहणीची मुदत ही खरीप हंगामासाठी 30 जून ते 30 सप्टेंबर असावी व रब्बीसाठी 1 नोव्हेंबर ते 31 मार्च पर्यंत असावी तसेच उन्हाळी पिकांसाठी 1एप्रिल ते 30 जून पर्यंत करण्यात यावी.

६) उन्हाळी धानाचे उर्वरित संपूर्ण चुकारे मिळण्याबाबत…

        महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन द्वारे धान उत्पादक शेतकऱ्यांकडून उन्हाळी पिकाचे धान खरेदी करण्यात आलेले होते. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना आजपर्यंत धानाचे चुकारे आणि बोनस सुद्धा मिळाले नाही. तरी धानाचे चुकारे शासनाकडून त्वरित देण्यात यावे.

७) खरिप धान बोनस मिळण्याबाबत…

        मागील खरिप धान बोनस उर्वरित शेतकरी किंवा आधारभूत केंद्रावरील डिलिट झालेल्या सातबारा धारक शेतकऱ्यांना हेक्टरी २०,००० रुपये त्वरित देण्यात यावे

          शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता आमच्या सोबत आपण तत्काळ बैठकीची वेळ द्यावी व शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित सोडवाव्या असे न झाल्यास भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत तर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल.असे या निवेदनात म्हटले आहे.

          यावेळी जिल्हा सहमंत्री ऋग्वेद येवले, तालुकाध्यक्ष गिरीधर लांजेवार, अंकित कापगते सोशल मीडिया प्रमुख, मिलिंद कापगते,टिकेश बहेकार, जयदेव भलावी, भिमराव तवाडे,देवानंद येरने,मयुर चिरवतकर,आवरकर व तालुक्यातील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.