रोहन आदेवार
जिल्हा प्रतिनिधी
यवतमाळ :- मारेगाव तालुक्यातील आपटी रेती घाटावर सुरू असलेल्या कथित अवैध रेती उत्खननाचा मुद्दा उघड केल्यानंतर ‘मारेगाव वार्ता’चे संपादक तथा पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन मेश्राम यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा आरोप समोर आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मेश्राम यांनी आज (२४ एप्रिल) तहसील कार्यालयासमोर आपल्या कुटुंबासह बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
मेश्राम यांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, आपटी रेती घाटावर नियमांचे उल्लंघन करून रात्रीच्या वेळी पोकलेन व बोटींच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात रेती उपसा होत असल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर २० एप्रिल रोजी रात्री सुमारे १०:०६ वाजता आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आलेल्या प्रदीप घागी (रा. वरोरा) याने फोनवरून अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मेश्राम यांनी केला आहे. तसेच जातिवाचक शब्द वापरून अपमान केल्याचाही दावा करण्यात आला आहे.
या संदर्भात संबंधित विभागांकडे तक्रार करण्यात आल्याचे मेश्राम यांनी सांगितले असून, अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. उपोषणा दरम्यान त्यांनी आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी, आपटी रेती घाटाचा परवाना रद्द करावा, अवैध उत्खननासाठी वापरली जाणारी पोकलेन व बोटी जप्त कराव्यात तसेच आपल्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे, अशा प्रमुख मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. “या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी व जनहित कल्याण संघटना यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.



