समाज उत्पती आणि समाज विकास या दोन गोष्टींचा इतिहास तपासला तर त्यात समाजाचे टप्पे आणि समाज स्थिरता या गोष्टीचा विचार पुढे येतो.
आधी माणसांची उत्पती झाली,त्यानंतर तो / ती एकटाच स्वतंत्र जीवन व्यतीत करीत होता किंवा जगत होता.त्यांना एकमेकांची किंवा एकमेकांच्या सहकार्याची,सहयोगाची,एकत्र रहाण्याची गरज वाटत नव्हती,स्त्रीला पुरुषाची किंवा पुरुषाला स्त्रीची गरज वाटत नव्हती.म्हणून एकत्र रहाण्याची त्यांना गरज वाटत नव्हती.
आपली लैंगिकभुक भागवण्यासाठी मात्र कोणतीही स्त्रीपुरूष केव्हाही कुणासोबतही तेवढ्यापुरते एकत्र यायचे,काम संपले की,कुणाचे कुणाशी काही संबंध नसायचा.त्यामुळे स्त्रीस होणारी मुले ही स्त्रीचीच असायची.मुलांना बाप नसायचा.मुलांना सांभाळण्याची ,संरक्षणाची जबाबदारी एकट्या स्त्रीवर असायची.या सामाजिक व्यवस्थेस ‘ मानवी रानटी व्यवस्था आणि अवस्था ‘ अशी ऐतिहासिक नोंद करण्यात आली.
समाजाचा दुसरा टप्पा म्हणजे ‘ टोळी व्यवस्था ‘ या व्यवस्थेत स्त्रीपुरूष काहीजण एकत्र राहायला लागली.टोळी करून एकत्रच शिकार करून किंवा फळे जमा करून एकत्रच खाऊ लागली.सहभोजन करू लागली,टोळीतील स्त्रिया आणि पुरुष यांनी लैंगिक स्वातंत्र्याची मर्यादा घालून घेतली. ती अशी की,टोळीअंतर्गतच कुणीही कुणाशीही स्त्रीपुरूष लैंगिक संबंध ठेवायचे,टोळीबाहेर लैंगिक संबंध ठेवायचे नाही.म्हणजेच सामूहिक भोजनासारखे सामूहिक लैंगिक संबंध रूढ झाले.
आपल्याच समूहाशी एकनिष्ठ राहण्याचे मूल्य आणि पावित्र्य निर्माण करण्यात आले.निष्ठा आणि पावित्र्य म्हणजे तरी शेवटी काय , तर ‘ कोणत्याही विचारास किंवा कृतीस मान्यता ‘ म्हणजेच निष्ठा.निष्ठा म्हणजे मूल्य.मूल्य म्हणजे पावित्र्य होय.टोळीचा समाज,टोळीची समाजव्यवस्था ,त्यातील लैंगिक संबंध,आणि लैंगिक व्यवहाराची मर्यादा इत्यादी नियम अटी बंधने म्हणजेच त्या टोळी समाजांचे मूल्य बनले.एकटे राहून जंगली जीवन जगणे,कठीण झाले,म्हणून टोळीने राहण्याची आवश्यकता वाटली.माणूस प्रथम हजारो वर्ष जंगलीजीवन एकटाच जगला.
परंतु हिंस्र प्राण्यापुढे एकटा माणूस तग धरू शकला नाही.हिंस्र प्राण्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी टोळीने राहण्याची अक्कल सुचली,म्हणून हजारो वर्ष माणूस टोळीव्यवस्थेचे जीवन जगला.सामूहिक राहण्यातून त्याची लैंगिक गरज पण सामूहिकच बनली.टोळीत जेव्हढी मुले जन्म घ्यायची तेव्हड्याची जबाबदारी ही टोळीची असायची.टोळीअंतर्गत स्त्रीपुरूष संबंध हा मुक्त होता.मात्र टोळीबाह्य संबंध निषिद्ध मानल्या जात असे.टोळीची अस्मिता,मान्यता,दर्जा,प्रतिष्ठा या गोष्टी महत्त्वपूर्ण आणि पवित्र मानल्या जात असे.म्हणजे या गोष्टीस समाज मान्यता मिळाली होती.
नंतर जेव्हा शेतीचा शोध लागला.’ मूठभर पेरले तर पोते भर मिळायला लागले,तेंव्हा भटका समाज,शिकारी समाज स्थिर झाला,आणि शाकाहारी बनला.जंगलात भटकणे बंद झाले.टोळ्या आता शेती करू लागले.जमीन कुणाच्याही मालकीची नव्हती,ती एक निसर्ग साधन संपती होती,शेती हे आता उत्पादनाचे साधन बनले.हे साधन ज्या टोळीला त्यांच्या ताकदीनुसार जेव्हढे कस ता येईल,तेवढ्यावर ताबा करू लागले.आणि कसून उत्पादन करू लागले.यातून कसलेल्या शेतीवर टोळीची सामूहिक मालकी निर्माण झाली.
कालांतराने टोळी समाजव्यवस्था संपुष्टात आली.कारण टोळीप्रमुख हा राजा बनला.आणि टोळीतील माणसे त्याचे सैनिक आणि गुलाम झाले.बळी तो कान पिळी,आणि जो स्वार्थी दुष्ट कपटी तो राजा बनला,टोळीचा मालक झाला.शेतीचा मालक झाला,आणि टोळीतील सर्वांना नोकर गुलाम बनविले.
चलाखी कपट कारस्थान करून टोळी अनेक टोळी प्रमुख संस्थानिक बनले.एकमेकाशी लढाई करून एकमेकांना जिंकून घेऊ लागले.पराभूत टोळ्यांना गुलाम करून त्यांची खरेदी विक्री होऊ लागली.गुलाम स्त्री पुरुषांचा आठवडी बाजार भरायला लागला.एकमेकावर लढाया करून त्यांना हरवून,त्यांचे भूभाग आपल्या ताब्यात घ्यायला लागले.यातूनच राजेशाही ,त्यानंतर हुकुमशाही निर्माण झाली.
राजाने जमीनदार नेमून आपल्या ताब्यातील काही जमीन त्यांना दिली,हे जमीनदार शेतकऱ्यांना कसायला देऊ लागले.त्यातून कुळपद्धत अस्तित्वात आली.कास्तकार शेतकरी म्हणजे कुणबी झाला.पुढे कुणबी ही जातच निर्माण झाली.हिस्याहिस्याने शेती कसण्याच्या पद्धतीतून ‘ कुटुंब व्यवस्था ‘ निर्माण झाली.म्हणजेच सरंजामी अवस्थेत कुटुंबव्यवस्था निर्माण झाली.अस्तित्वात आली.
ज्या ज्या राजाने आपल्या राज्यात उत्पादन साधनांवर मालकीहक्क देऊ केले,त्या त्या राज्यात मालकी हक्काचा कायदा निर्माण झाला.या अवस्थेत पुरुषमंडळीनी उत्पादनाची साधने आपल्या नावे करून घेतली.स्त्रीयांना बाजूला सारले.इथेच स्त्रिया परावलंबी पराधीन झाल्या.पुरुषसत्ताक पद्धती रूढ झाली.
शेती,उद्योग,कारखाना,कंपनी,व्यापार,संस्था यावर पुरुषमंडळीची मालकी स्थापित झाली.म्हणून कुटुंब प्रमुख हा पुरुष झाला.सरंजामशाही,राजेरजवाडे व्यवस्थेच्या आधी, टोळी व्यवस्थेचा अंत होत होता,शेतीचा शोध लागला होता,तेंव्हा टोळीतील स्त्रिया शेती करायच्या आणि पुरुष शिकारीला जायचे.असे श्रम विभाजन झाले,त्यावेळी काही भागात मातृसत्ताक पद्धती पण अस्तित्वात आली होती.मातृसत्ताक कुटुंबात स्त्री कुटुंब प्रमुख होती.पुरुषास दुय्यम स्थान होते.
जेंव्हा स्त्रीचा दर्जा प्रॉपर्टीसमान झाला,तेंव्हा स्त्री ही मालकीची वाटायला लागली.स्त्रीला संपती समजून कुटुंबात वागणूक मिळू लागली. वस्तू प्रमाणे ती हस्तांतरित बनली.तिचे देणेघेणे सुरू झाले.विवाह पद्धत रूढ करून तिला मालकीची बनविण्यात आले.पुरुषांनी आपल्या प्रॉपर्टीला वारसदार निर्माण करण्यासाठी या उद्देश्याने तिचा वापर सुरू झाला.
वारसदार हा आपल्याच रक्ताचा असावा,यासाठी स्त्रीचे लैंगिक स्वातंत्र्यावर बंधन आणले.तिच्या भावना, इच्छा,आकांक्षा,स्वतःचे मन,विचार यास बंधन केल्या गेले.एकंदरीत स्त्रीमुक्ती रोखल्या गेली,कुटुंब व्यवस्थेमुळे.कुटुंब म्हणजे स्त्रीसाठी जिव्हाळा,माया,ममता,प्रेम,आधार,संरक्षण,खात्रीचे ठिकाण वाटण्या ऐवजी असुरक्षित ठिकाण वाटायला लागले.
केवळ खाजगी मालमत्तेच्या हक्काचा धनी मीच आहे,आणि त्याचा वारस हा माझ्याच रक्ताचा आहे,हे सिद्ध करण्यासाठी स्त्रीचे लैंगिक स्वातंत्र्य आणि भावनिक स्वातंत्र्य यावर गदा आणल्या गेली.संपत्तीच्या मोहापायी.वर्चस्वाच्या अहंकार पायी,स्त्रीवर अन्याय करण्यात आला. म्हणूनच आधुनिक काळातील स्त्रियांनी स्त्रीमुक्तीचा लढा सुरू केला आहे.
स्त्री पुरुष समानतेची,विषमते विरुद्ध समतेची, अन्यायाविरुद्ध न्यायची,मानवी हक्काची,स्त्रीअधिकाराची ही लढाई आहे,आता या स्त्रीशक्तीस कुणीही रोखू शकत नाही.
केवळ संपत्तीचा मोहापायी,खाजगी मालमत्तेचा हक्काचे कायदे करायचे,त्यात स्त्रीयांना बाजूला ठेवायचे,वंशाच्या दिव्यापायी तिचे लैंगिक स्वातंत्र्य सिमित करण्यासाठी, पतीनिष्ठा,पती म्हणजे देव,पातिव्रत्य , सती, पावित्र्य या संकल्पना धर्माच्या नावाने रूढ करून स्त्रियांवर अन्याय करणे ही पुरुष वर्गाची आणि मालकी हक्काच्या समर्थकांची चालबाजी आहे.स्वार्थपणा आहे.धूर्तपणा आहे.केवळ संपत्तीवर आपलीच मालकी असावी,या हट्टापायी.
या अशा पुरुषी कृत्याने आणि धोरणाने अनंत काळापासून स्त्रीचा बळी घेतल्या जातो आहे.तिला माणसाचा अजूनही दर्जा दिला जात नाही.हा केव्हढा घोर अपराध आहे.


