Home देशविदेश देवाच्या घरात धर्म आणि देवात माणूस अडकला…

देवाच्या घरात धर्म आणि देवात माणूस अडकला…

दखल न्युज भारत विशेष 

          धर्माचा केंद्रबिंदू माणूस असावा आणि माणसाचा केंद्रबिंदू धर्म असला पाहिजे,तरच माणसाची नैतिक मानसिक प्रगती होते.परंतु माणसाचा आणि धर्माचा दोघांचाही केंद्रबिंदू हा देवच असल्यामुळे सारा घोळ झाला.केंद्रबिंदू म्हणजे टार्गेट धेय्य. 

           खरे तर धर्माचे असो की माणसाचे लक्ष्य हे ‘समाज’ असायला पाहिजे.समाज आणि त्याची धारणा ( धर्म ) काय असला पाहिजे ? कशी असली पाहिजे ? याचे चिंतन धर्माने करायला हवे.पण असे घडताना दिसत नाही.उलट काल्पनिक देव आणि धार्मिक संकल्पना घेऊन माणूस जगताना दिसतो,हे त्याच्या प्रगतीचे लक्षण नसून अधोगतीचे कारण आहे.चिंतन केले तर आपणास समजून येईल.

          धर्म देवासाठी नसून माणसासाठी आहे.आणि माणूस देवासाठी नसून धर्मासाठी असावा.कारण धर्म म्हणजे नैतिकतेचे विचार आणि आचरण असते.यासाठी समाजाचे प्रबोधन आणि समाजाचा स्वीकार आवश्यक आहे.म्हणून धर्म हा व्यक्ती पुरता किंवा देवा पुरता मर्यादित न ठेवता तो समाजासाठी व्यापक हवा.धर्माचे मुख्य कर्तव्य व्यक्तीची नीतिमत्ता शाबूत ठेवणे,आणि समाजाची नैतिक मूल्याची धारणा टिकविणे. समाजात नैतिकता रुजविणे,वाढविणे,टिकविणे हे धर्माचे मुख्य लक्ष्य असले पाहिजे.

         देवाची स्तुती,आरती,आराधना,पूजा,भजन,करून मोक्ष मिळविणे या अवास्तव खोट्या कल्पना घेऊन धर्माची किंवा व्यक्तीची वाटचाल होता कामा नये.

            देव मोक्ष स्वर्ग नरक या गोष्टी बुध्दी तर्क पुरावे अनुभवाच्या कसोटीवर खोट्या सिद्ध होतात.त्या काल्पनिक सिद्ध होतात.म्हणून माणसाने आणि त्याच्या धर्माने म्हणजे धारणानी आभाशी दुनियेत न वावरता वास्तविक दुनियेत वावरावे.वास्तविक विचारात रमावे.

             सत्य शोधावे,देवावर विसंबून न राहता स्वतःवर अवलंबून राहावे.कारण जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला,असे संतवचन आहे.म्हणून तूच आहेस तुझा शिल्पकार,अतः दीप भव हा उपदेश हा विचार घेऊन चालले तर माणसाचे परवलंबन ,इस्वरावर अवलंबून राहणे थांबेल,स्वकरुत्व, आत्मविश्वास,धैर्य,आपलेतील सुप्तगुन आणि त्यांची वाढ,हेच आपले जीवन पालटू शकतात.स्वर्गात कुणीतरी आहे,तो अवतार घेऊन खाली येऊन आपला उध्दार करील,म्हणून वाट बघण्याची गरज नाही.कारण तो नाहीच तर येणार कसा ? अंधश्रध्दा सोडली पाहिजे.काल्पनिक जगातून वास्तविक जगात असले पाहिजे. स्वावलंबन आणि स्वाभिमान जागृत ठेवला तरच गुलामीतून मुक्ती मिळेल.

            म्हणून माणसाचा धर्म म्हणजेच सत्य न्याय निती,प्रज्ञा,शिल,करुणा,मैत्री,दया,क्षमा,शांती,स्वातंत्र्य,समता, बंधुभाव ही नीतिमूल्ये आणि त्याचे आचरण म्हणजेच धर्म होय.

          असा धर्म चार भिंतीच्या देवळात, मज्जिद,चर्च,विहार मध्ये नसतो तर तो उघड्या वातावरणात समाजात असतो.आणि धर्माचा माणूस ईश्वर मध्ये नसतो,किंवा ईश्वर माणसात नसतो.तर माणूस माणसात च असला पाहिजे.माणसाची माणसापासून फारकत होता कामा नये.ही फारकत औपचारिक धर्मांनी केलेली आहे.खरे तर बौद्ध ख्रिचन,मुस्लिम,हिंदू,वैदिक ,पारशी,इत्यादी धर्माची माणसाला काहीच गरज नाही.खरी गरज आहे,मानवता धर्माची माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे.

          स्थल, काल, परिस्थिती नुसार नीतिमूल्ये बदलली पाहिजेत आणि स्वातंत्र्य,समता, बंधुभाव, न्याय ही चिरंतन मानवी मूल्यांचा स्वीकार व पालन करून जीवन जगले पाहिजे.यालाच मानवता धर्म,सर्वांचा धर्म होय.जो मानवी समाजात असतो,देवळात नसतो या धर्माचा माणूस देवात अडकून पडत नाही तर तो समाजात मुक्तपणे वावरत असतो.

लेखक :- दत्ता तुमवाड

 सत्यशोधक समाज नांदेड

    फोन :- 9420912209