दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : न्यायदान करताना सामाजिक प्रश्नांच निराकरण करणे महत्वाचे असते त्याकरिता न्यायाधीशाने सामाजिक भान जपणेही गरजेचं आहे असे मत माननीय न्यायमूर्ती डॉ.शालिनी फणसळकर जोशी(निवृत्त न्यायाधीश, उच्च न्यायालय मुंबई) यांनी दि. २३ ऑगस्ट २०२३ रोजी भारती विद्यापीठाच्या सभागृहात पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात व्यक्त केले.
कोठेवाडी, शक्ती मिल या गाजलेल्या खटल्याचे न्यायदान करताना आलेले अनुभव त्यांनी कथित केले आणि न्यायदानाचे क्षेत्र किती महत्वाचे आहे याबद्दल विधी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
समाजासाठी निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या पण प्रसिद्धीपासून दूर असलेल्या सामान्यातील असामान्य व्यक्तींना दरवर्षी 4C’s Counselling Center च्या वतीने आणि भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय न्यू लॉ कॉलेज येथील कौटुंबिक व सल्ला मार्गदर्शन केंद्राच्या सहकार्याने कै.मालती रामचंद्र जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रीमती मालती जोशी सामाजिक भान पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो.
सन २०२२ या वर्षीचा पुरस्कार दिव्यांग व्यक्तींसाठी काम करणारे “अद्वैत परिवार” या संस्थेचे समन्वयक संतोष शिवाजी डिंबळे यांना न्या.शालिनी फणसळकर जोशी (निवृत्त न्यायाधीश, उच्च न्यायालय मुंबई) आणि भारती विद्यापीठ शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती विजयमाला पतंगराव कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आणि मानपत्र देऊन गौरवण्यात आले. प्रभारी प्राचार्या आणि अधिष्ठाता डॉ.उज्वला बेंडाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी श्रीमती विजयमाला पतंगराव कदम म्हणाल्या की, सध्याच्या परिस्थितीत समाजसेवेचे अवडंबर करणारे लोक अधिक आहेत.परंतु प्रत्येकाने भान ठेवून आपले काम करणे महत्वाचे आहे.घरगुती नाती जपतानाही दुसऱ्याला काय वाटेल याचं भान ठेवलं जात नाही. ‘मी आणि माझं” प्रत्येकाला हवं आहे,स्वतः ची स्पेस हवी आहे,परंतु या स्पेस च्या नावाखाली फक्त स्वतः चा विचार केला जातो, एकमेकांना समजावून घेणं होत नाही याचा तरुण पिढीने विचार करणे महत्वाचे आहे. प्रकाश जोशी यांनी त्यांच्या मातोश्रींच्या नावाने हा पुरस्कार दरवर्षी देण्याचे ठरवले याबाबत त्यांचे आणि जोशी कुटुंबीयांचे त्यांनी अभिनंदन केले आणि कायद्याच्या विद्यार्थ्यांसमोर हा पुरस्कार प्रदान करून त्यांच्यावर योग्य संस्कारांची रुजवण घातल्याबद्दल प्राचार्या उज्वला बेंडाळे यांचेही कौतुक केले.
दिव्यांग मुलांना ‘मदत नको संधी द्या’ या वाक्याने प्रेरित होऊन त्यांना स्वतः च्या पायावर उभं राहण्यासाठी आणि मानसन्मानाने जगता यावे यासाठी प्रयत्न करणारे श्री.संतोष डिंबळे यांचे अभिनंदन केले आणि सामाजिक भान पुरस्कारासाठी त्यांची निवड केल्याबद्दल 4C’s Counselling Centre, पुणे चे आभार व्यक्त केले.
पुरस्कार स्वीकारताना संतोष डिंबळे यांनी दिव्यांग मुलांना सहानुभूती नको असते परंतु एखादी संधी दिली तर ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात याबाबतची माहिती दिली. दिव्यांग मुले स्वयंपाक करतात, वडापावचे गाडे चालवतात, ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम करतात,विविध सणांसाठी वस्तू तयार करतात. अशा दिव्यांग मुलांना समाजाकडून संधी दिली जावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
न्यू लॉ कॉलेजच्या अधिष्ठाता व प्राचार्या डॉ. उज्वला बेंडाळे यांनी कॉलेजच्या व कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्राच्या उपक्रमाबाबतची माहिती प्रास्ताविकात दिली तर डॉ.सागर पाठक यांनी प्रस्ताविक करताना 4C’s Counselling Centre,pune या संस्थेच्या कार्याबाबत माहिती दिली.
डॉ.स्मिता जोशी यांनी श्रीमती मालती जोशी यांचा जीवनपट उलगडून दाखवला. डॉ.सागर पाठक यांनी उपस्थितांचे आभार मानले. श्रीमती अश्विनी कळंबकर आणि ऊर्जा नेऊरगावकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.