पालखी सोहळा समन्वयासाठी माजी विश्वस्त पिंपळे, टिळक आणि सुरु यांचे सहकार्य घेणार : पालखी सोहळाप्रमुख ढगे पाटील 

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२३ साठी आळंदी-पंढरपूर पालखी मार्गावर वारकरी भाविकांना सर्व आवश्यक सोई सुविधा देताना प्रशासनाबरोबर ठेवावा लागणारा समन्वय व प्रत्यक्ष सोहळ्यामध्ये सहभागी होऊन करावी लागणारी वाटचाल याचा विचार करता आळंदी देवस्थानचे माजी विश्वस्तांचे सहकार्य घेण्याचा ठराव श्री.ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने मासिक सभेत केला. यामुळे आळंदी देवस्थानचे अभ्यासू माजी विश्वस्त डॉ.अभय टिळक, सुधीर पिंपळे, डॉ.प्रशांत सुरु यांचे आषाढी पालखी वारी काळात सहकार्य घेण्यात येणार असल्याचे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे पालखी सोहळाप्रमुख अॅड.विकास ढगे यांनी सांगितले. 

         संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२३ या वर्षीच्या आषाढी पायी वारी सोहळा शिस्तीत, शांततेत, आनंदात व वारकऱ्यांची सुरक्षितता व आरोग्य विचारात घेऊन पार पाडणे आवश्यक व गरजेचे आहे. या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यामध्ये प्रथमच तीन विश्वस्तांना पालखी सोहळा २०२३ साठी मुदत वाढ मिळाली आहे, उर्वरित तीन विश्वस्तांच्या जागा अद्याप भरल्या गेल्या नाही. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात साधारण चार ते पाच लाख लोकांचे वेगवेगळ्या स्तरावरील नियोजन प्रशासनाबरोबर ठेवावा लागणारा समन्वय व प्रत्यक्ष सोहळ्यामध्ये सहभागी होऊन करावी लागणारी वाटचाल याचा विचार करता सध्याच्या नियुक्त विश्वस्तांना प्रचंड ताण येणार आहे. माजी विश्वस्तांनी सोहळ्यासाठी अत्यंत चांगले योगदान दिले आहे. वारकऱ्यांशी व प्रशासनाशी सुसंवाद यापूर्वीचे अभ्यासू विश्वस्त टिळक, पिंपळे, सुरु यांनी कायम ठेवला आहे. त्यांचे सहकार्य घेण्याचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी सुचविले असता त्यास दुसरे विश्वस्त अॅड.विकास ढगे यांनी अनुमती दिली. याबाबत ठराव उपस्थित विश्वस्तांनी एकमताने मंजूर केला. यामुळे पालखी सोहळा व्यवस्थीत पार पाडण्यासाठी या तीन माजी विश्वस्तांचे सहकार्य लाभणार आहे.