Home देशविदेश स्मृतिशेष मा.म.देशमुख यांना आदरांजली अर्पण करताना :- सविता सोनावणे….

स्मृतिशेष मा.म.देशमुख यांना आदरांजली अर्पण करताना :- सविता सोनावणे….

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

             वृत्त संपादीका 

      1980 च्या दशकात पंजाबमधील चर्मकार समाजाचे मान्यवर कांशीरामजी या तरुणाने इथल्या सांस्कृतिक चळवळीचा अभ्यास केला आणि त्यांना आकलन झालं की,इथला बहुजन समाज सांस्कृतिक गुलगिरीत पूर्णपणे अडकलेला आहे आणि म्हणूनच राजकीय सत्तेकडे जाण्याचा त्यांचा मार्गही पूर्णपणे बंद झालेला आहे.

       डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून मग त्यांनी साडेसात हजार जातींमध्ये विभागलेल्या आणि जात उतरंडीतील अभिमानाने एकमेकांशी फारकत घेऊन पुरोहितगिरीचे वर्चस्व असलेल्या ब्राह्मणी संस्कृतीच्या पूर्णपणे आहारी गेलेल्या संपूर्ण बहुजन समाजाला जागे करण्याचा चंग बांधला.

       त्यासाठी त्यांनी बहुजन समाजातील उच्चशिक्षित तरुणांकडे मोर्चा वळवला.ओबीसी समाज हा प्रामुख्याने या ब्राह्मणी संस्कृतीचा वाहक आहे ,हे लक्षात घेऊन त्यांनी या समाजातील उच्चशिक्षिताना सोबत घेऊन त्यांच्याकरवी साळी,माळी,कुणबी,चांभार, ढोर, लोहार,सुतार अशा जातींमध्ये जागृती आणायला सुरुवात केली.

     हळूहळू बामसेफ नावाच्या संघटनेत अशा तरुणांची फौज उभी राहिली.आपला इतिहास शोधून ते लोकांना सांगू लागले प्रभावी लेखणी – वाणीतून…

   यातीलच एक कुणबी समाजातील झपाटलेला तरुण म्हणजे आदरणीय मा. म.देशमुख. इतिहासाचा प्रचंड व्यासंग असलेल्या मा.म.देशमुख सरांनी वेगळ्या पद्धतीने इतिहासाची मांडणी केली.

       बुद्धांच्या ‘सम्यक दृष्टी’ने इतिहासाकडे पाहून ब्राह्मणी संस्कृतीशी संघर्ष करणाऱ्या बहुजन महापुरुषांना लोकांच्या समोर ठेवलं.

      भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा मध्ययुगीन इतिहास खरा खरा लिहिला म्हणून त्यांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढली गेली.आंबेडकरी चळवळीतील समूहाने मात्र लगेचच त्यांची सन्मानयात्रा काढून 

प्रेतयात्रेला नामशेष करून टाकलं. 

        मा.म.देशमुख आता घराघरात पोचले.आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक बौद्ध घरांच्या पुस्तक संग्रहालयात बाबासाहेबांच्या ग्रंथांच्या सोबतच मा.म.देशमुखही दिसायला लागले.प्रचंड प्रेम केलं या इतिहासकारावर आंबेडकरी चळवळीतील समूहाने आणि आंबेडकरी चळवळीला सुद्धा देशमुख सरांनी भरभरून दिलं.

       प्रत्येक कार्यक्रमात स्वतः पुस्तकांच्या स्टॉलवर काही वेळ बसणे आणि वाचकांना पुस्तकाचं महत्त्व सांगणे हे काम सरांनी मनापासून केलं.

      त्यांची एक- दीड तासांची भाषणे तर श्रोत्यांना खिळवून ठेवणारी असत.मी त्यांची कितीतरी भाषणे ऐकलेली आहेत.

       आज मा.म.देशमुख या आंबेडकरी चळवळीतील इतिहासकाराचं निधन झाल्याची बातमी ऐकून मनात आलं की,त्यांची जागा घेणारे असे विचारवंत -कार्यकर्ते ओबीसी समुदायामध्ये दिसतील का,जे बुद्ध- कबीर- शिवराय – फुले- शाहू ..या साऱ्या महापुरुषांच्या तत्त्वज्ञानाला सामावून घेणारं ‘समग्र आंबेडकरी तत्त्वज्ञान’ स्वीकारून आपल्या समाजाला जागे करतील आणि आज सुरू असलेली निकराची सांस्कृतिक लढाई जिंकण्यासाठी हातभार लावतील.