अबोदनगो एस चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनीधी
अमरावती :- खुनाच्या गंभीर आरोपातून निर्दोष सुटलेला आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित अपीलप्रकरणात गैरहजर राहून तब्बल १९ वर्षे फरार असलेला आरोपी अखेर राजापेठ पोलिसांच्या वारंट पथकाच्या सापळ्यात सापडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोहर केशवराव खंडाते (वय ५५, रा. दुधगंगा कॉलनी, जेवड नगर, अमरावती) याच्यावर कलम ३०२ भादवी अंतर्गत खुनाचा गुन्हा होता. २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयात क्रिमिनल अपील क्र. १०२१/२०१२ दाखल असताना तो गैरहजर राहिला. जिल्हा न्यायाधीश-५ तथा अपर सत्र न्यायाधीश, अमरावती यांनी त्याच्याविरुद्ध पकड वॉरंट काढून ४ सप्टेंबर २०२५ रोजी राजापेठ पोलिसांना अटक करण्याचे आदेश दिले होते.
जेलमधून सुटल्यानंतर खंडाते याने अमरावतीतील आपली सर्व पूर्वीची राहती ठिकाणे सोडून अज्ञात स्थळी स्थलांतर केले होते. त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी कठीण झाले होते. मात्र १६ सप्टेंबर रोजी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार तो वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील बांगडापूर येथे शेतातील झोपडीत वास्तव्य करीत असल्याचे समजले.
यानंतर वॉरंट पथकाचे पो.हवा. आशिष विघे, विक्रम देशमुख, सतीष टपके, आबिद शेख व चालक विजय यादव यांना १७ सप्टेंबर रोजी रवाना करण्यात आले. त्यांनी बांगडापूरपासून दोन किमी अंतरावर सुखदेव धुर्वे यांच्या शेतातील झोपडीत आरोपी खंडाते याला जेरबंद केले.
त्याला राजापेठ पोलीस ठाण्यात आणून सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित अपील प्रकरणानुसार अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरीया, उपायुक्त शाम घुगे, सहायक आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनित कुलट व वॉरंट पथकाने केली.

