अबोदनागो चव्हाण
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
दखल न्युज भारत…
अमरावती :- शहरातील तपोवन परिसरात गुरुवारी पहाटे भीतीदायक प्रकार घडला.
डॉक्टर कॉलनीतील एका घराच्या कंपाउंडमधून आत शिरलेल्या बिबट्याने घराच्या पहिल्या मजल्यावर झोपलेल्या पाळीव कुत्र्याची शिकार केली.
बिबट्याने कुत्र्याला तोंडात धरून ज्या मार्गाने घरात प्रवेश केला होता,त्याच मार्गाने पुन्हा जंगलाकडे पळ काढल्याचे समजते.
या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ माजली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,डॉक्टर कॉलनी येथे नांदगाव पोलीस ठाण्याच्या गुप्तचर विभागात कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल संजय देऊळकर आपल्या कुटुंबासह पत्नी,मुलगा व मुलगी गेल्या १५ वर्षांपासून राहतात.
त्यांच्या घरात सुमारे पाच वर्षांचा ‘शिवा’ नावाचा पाळीव कुत्रा होता.सध्या त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर बांधकाम सुरू आहे.त्यामुळे कुत्रा दररोज रात्री अंगणात असलेल्या रेती-गिट्टीच्या ढिगाऱ्यावर झोपायचा.
गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास अंगणातून काही आवाज आल्याने देऊळकर कुटुंबातील सदस्य जागे झाले.त्यांना वरच्या मजल्यावरून पाईप पडल्याचा आवाज ऐकू आला.
प्रथम त्यांना वाटले की,घरात चोर शिरला असावा.त्यांनी धाडस करून दरवाजा उघडून अंगणात पाहणी केली आणि कुत्र्याला हाक मारली,परंतु काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
यानंतर त्यांनी अंगणातील लाईट सुरू करून शोध घेतला असता काही ठिकाणी रक्ताचे डाग आणि कुत्र्याचे मल सापडले.त्यानंतर त्यांनी नीट निरीक्षण केले असता बिबट्याचे पावलांचे ठसे कंपाउंडच्या भिंतीवर आणि मुख्य गेटवर माती व रक्ताचे डाग दिसून आले. त्यामुळे त्यांच्या लक्षात आले की, परिसरातील जंगलात भटकणाऱ्या बिबट्याने घरात घुसून त्यांच्या पाळीव कुत्र्याची शिकार केली आहे.
घटनेची माहिती मिळताच देऊळकर यांनी तातडीने पोलिस आणि वन विभागाला कळविले. ही या भागातील दुसरी घटना आहे. यापूर्वीही याच भागात राहणाऱ्या तपोवन संस्थेच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरात बिबट्याने उडी मारून त्यांच्या पाळीव कुत्र्याची शिकार केली होती.
त्या वेळी कुत्र्याचे शव घरामागील झुडपातून सापडले होते. त्यानंतर वन विभागाने काही काळ पकड मोहिम राबवली होती.
मात्र बिबट्या सापडला नाही आणि मोहिम थंडावली. आता पुन्हा त्याच परिसरात घडलेल्या नव्या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.स्थानिकांनी त्वरित बिबट्याला पकडण्यासाठी उपाययोजना कराव्यात आणि परिसरात रात्र गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.



