कान्हेवाडी तर्फे चाकण ग्रामपंचायत सलग दोन वर्षे पुणे विभागात प्रथम, ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान… 

 

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक

पुणे : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत सन २०१८/१९ व २०१९/२० या सालासाठी कान्हेवाडी तर्फे चाकण ग्रामपंचायतीस प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा आयुक्त कार्यालय पुणे येथे संपन्न झाला.

        यावेळी पुणे विभागाचे आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, यशदा प्रकल्पाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, राज्यप्रकल्प संचालक आनंद भंडारी, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे यांच्या उपस्थितीत सन २०१८/१९ व २०१९/२० या सालासाठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात पुणे विभाग स्तरावर ग्रामपंचायत कान्हेवाडीस प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. 

       यावेळी कान्हेवाडीचे सरपंच भाऊसाहेब पवार, उपसरपंच स्वाती येवले, ग्रामविकास अधिकारी अरुण हुलगे, ग्रा.पं.सदस्य राहुल येवले, सुवर्णा ढोरे, ओमेश्वरी ढोरे, आरती खैरे, अनिल कडलक, भाग्यश्री येवले, कर्मचारी महादू येवले यांनी पुरस्कार स्वीकारला.

       कान्हेवाडी ग्रामपंचायतने गेली १५-१६ वर्षे सातत्याने शासनाच्या विविध योजनांमध्ये सहभाग घेऊन गावामध्ये अनेक विकासकामे केली आहेत. यामध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी यांचे वेळोवेळी मोलाचे सहकार्य मिळाले आहे. संत गाडगेबाबा अभियानात गेली १७-१८ वर्षे सलग सहभाग घेऊन तालुका व जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवत आहे. ग्रामपंचायतीने गावातील प्रत्येक कुटुंबाला सातत्याने स्वच्छ पाणीपुरवठा नळमीटरद्वारे केला आहे. घनकचऱ्यासाठी नॅपेड खड्डे जागोजागी बांधण्यात आले असून सुका कचरा, प्लास्टिकसाठी लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. तसेच काच व लोखंडासाठी प्लास्टिक ड्रम ठीकठिकाणी बसविण्यात आले आहेत. संपूर्ण गावातील सांडपाणी एकत्र करून स्थिरीकरण तलावात सोडण्यात येते. त्यावर प्रक्रिया करून सांडपाण्याचा झाडांसाठी पुनर्वापर करण्यात येत आहे.

       लहान मुलांसाठी सुसज्ज अंगणवाडी केंद्र असून त्यामध्ये लहान मुलांना शिक्षणाबरोबर पोषण आहार पुरविला जातो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सुसज्ज इमारत असून मुलांना डिजिटल शिक्षणाची सुविधा केली आहे. तसेच मुलांना खेळण्यासाठी उद्यान, खेळाचे मैदान, पक्षीउद्यान, वनौषधी प्रकल्प, शौचालय सुविधा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून गरोदर महिला, किशोरवयीन मुली, नवजात बालकांना लसीकरण ई. सुविधा दिल्या जातात. यामध्ये अंगणवाडीताई, आशावर्कर, शिक्षकवृंद, आरोग्य कर्मचारी या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. गावामध्ये २१ बचत गट असून त्यामध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे. महिलांना विविध व्यवसायासाठी अर्थसहाय्य मिळण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील असते. युवकांसाठी खेळाचे मैदान, सुसज्ज व्यायामशाळा उभारली आहे.

        ग्रामपंचायत गेली १६ वर्षे १ एप्रिल या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी १००% करवसुली करत आहे. तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत गावात होणाऱ्या अंत्यविधीनंतर अस्थींचे विसर्जन नदीत न करता शेतामध्ये खड्डे घेऊन त्यामध्ये रक्षा विसर्जित करून त्यावर वड, पिंपळ सारख्या देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात येते. त्यामुळे नदी प्रदूषण कमी होण्यास मदत होत आहे.