रोहन आदेवार
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ/वर्धा
मारेगाव :- देशाचे सरन्यायाधीश मा.न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान झालेल्या घृणास्पद हल्ल्याचा मारेगाव तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघून तहसील कार्यालयावर पोहोचला. तहसीलदारांना तसेच आमदार संजय देरकर यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, सरन्यायाधीशांवर हल्ला हा केवळ एका व्यक्तीवर नव्हे, तर भारतीय लोकशाही संस्थांवर झालेला अपमान आहे. आरोपीवर केवळ निलंबन नव्हे, तर कठोर कायदेशीर कारवाई करत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.
मोर्चादरम्यान “भारतीय संविधान जिंदाबाद!”, “भारतीय लोकशाही जिंदाबाद!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या मोर्चात ज्ञानेश्वर मुन, अनिल खैरे, अभिषा निमसटकर, यशोधरा लिहीतकर, अनंता खाडे, रवी तेलंग, रेखाताई काटकर, शोभाताई दारुंडे, विप्लव ताकसांडे, संजय जीवने, अमरनाथ तेलतुंबडे, गौतम ताकसाडे, धम्मपाल दारुंडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.



