टाळ-मृदंगाच्या गजरात देहूत रंगला तुकोबारायांचा पालखी प्रस्थान सोहळा… — उद्या सकाळी सहा वाजता आकुर्डी कडे रवाना होणार… 

 

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

पुणे : ‘तुकाराम तुकाराम’चा गजर, ‘ज्ञानबातुकाराम’च्या तालावर खेळली जाणारी पावली, टाळ-मृदंगाच्या घोषात टिपेला पोहोचलेला विठूनामाचा गजर आणि भक्तांचा उसळलेला जनसागर… अशा भक्तीमय वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज (दि. १०) आषाढी वारीसाठी देहूतून प्रस्थान ठेवले.

      देहू येथील मंदिरात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सपत्निक तुकोबारायांच्या पादुकांचे पूजन आणि आरती केली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, श्रीकांत भारतीय, माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे, बारामती हाय-टेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आदी उपस्थित होते.

      पूजेनंतर उपस्थित सर्वजण वारकऱ्यांमध्ये टाळ-मृदुंगाच्या गजरात दंग झाले. यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. पुरुषोत्तम मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, संतोष मोरे, विशाल मोरे, संस्थानचे विश्वस्त संजय मोरे, भानुदास मोरे, अजित मोरे आदी उपस्थित होते.

      पालखी प्रस्थानाची सुरुवात पहाटेपासूनच विधिवत पूजेने झाली. पहाटे श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. दुपारी मंदिरात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सपत्निक तुकोबारायांच्या पादुकांचे पूजन आणि आरती केली. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा हा ३३८वा पालखी प्रस्थान सोहळा दुपारी दोनच्या सुमारास सुरू झाला. साडेतीन वाजता संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले. महापूजेनंतर पालखी इनामदारवाड्यातील मुक्कामाच्या ठिकाणी विसावली.

      या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक कालपासूनच देहूत दाखल झाले होते. देहू गाव आणि इंद्रायणी नदी परिसर गजबजून गेला होता. मुख्य मंदिरासह तुकोबांच्या शिळा मंदिरावर आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती.

       तुकोबारायांच्या पालखीसोबत पंढरीच्या आषाढी वारीला जाण्यासाठी महाराष्ट्रभरातून हजारो वारकरी देहूत प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावतात. हे वारकरी म्हणजे शेतकरी असतात. बहुदा मान्सून बरसल्यानंतर पेरणी करून हे शेतकरी वारीला निघतात. परंतु यंदा जून सुरू होऊन १० दिवस उलटले, तरीही पाऊस पडलेला नाही. त्यामुळे हा शेतकरी-वारकरी चिंतेत आहे. आता विठुरायानेच पर्जन्यराजाला कृपा करण्यास सांगावी, अशी मनोमन प्रार्थना करत वारकरी तुकोबारायांसोबत पंढरीच्या वाटेला लागले आहेत.

     उद्या भल्या सकाळी पालखी आकुर्डी मुक्कामाकडे निघणार आहे. आकुर्डी येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर पालिकेच्या वतीने अधिकाऱ्यांच्या १२ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते प्रत्येक २०० मीटर अंतरावर देखरेख करणार आहेत. मार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

      आकुर्डी येथे पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पालिकेने नियंत्रण कक्ष उभारला आहे. दिंड्यांच्या मुक्कामासाठी शाळा उपलब्ध करून दिल्या आहेत. या ठिकाणी स्वतंत्र समन्वयक नियुक्त केले आहेत. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालये, स्नानगृहांची व्यवस्था केली आहे. वैद्यकीय सुविधा, औषधे यांच्यासह मार्गावर फिरती रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. वैद्यकीय पथकामध्ये स्त्री रोग तज्ज्ञांची नेमणूक केली आहे.