Home Maharashtra वादळी वारा व पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान…. — आंब्याच्या बागांचे मोठे...

वादळी वारा व पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान…. — आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान,शेतकरी मुन्नास्वामी यांचे सुमारे सात टन आंबे जमीनदोस्त..‌

     सुधाकर दुधे..

तालुका प्रतिनिधी सावली..

       काल सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने परिसरात मोठा कहर केला.या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीपिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

        वादळाच्या वेगवान वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली,तर काही भागात विजेच्या तारांनाही फटका बसला.विशेषतः आंबा उत्पादक शेतकऱ्यांना वादळीवाऱ्यासह पावसाचा मोठा फटका सहन करावा लागला.

        चकपीरंजी येथील शेतकरी(अनिल ) मुन्ना स्वामी यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात आंब्याची बाग असून यावर्षी आंब्याचे उत्पादन चांगले आले होते.मात्र अचानक आलेल्या वादळामुळे त्यांच्या बागेतील झाडांवरील आंबे मोठ्या प्रमाणात खाली पडले. 

       जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या.तसेच कच्चे व पिकलेले आंबे जमिनीवर पडून खराब झाले.या आपत्तीत जवळपास सात टन आंब्यांचा माल खराब झाल्याचे सांगितले जात आहे. 

       बाजारात विक्रीसाठी तयार असलेला माल नष्ट झाल्यामुळे शेतकरी मुन्ना स्वामी यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.आधीच वाढलेला उत्पादन खर्च,मजुरी,औषध फवारणी आणि हवामानातील बदल यामुळे शेतकरी चिंतेत असताना या वादळी पावसाने त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

       घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली.अनेक शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

        नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले असून प्रशासनाने त्वरित मदत करावी,अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे.