दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : चहोली बु. दाभाडे सरकार चौक येथून चहोली खुर्दला जोडणारा इंद्रायणी नदीवरील एकमेव पूल गेल्या महिनाभरापासून वाहतुकीसाठी बंद असल्याने नागरिकांचे हाल होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संथगती कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक नितीन प्रताप काळजे यांनी सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून तातडीने पूल दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली आहे.
या पत्रात काळजे यांनी नमूद केले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शेवटच्या हद्दीत असलेला हा पूल चहोली बु. व चहोली खुर्द परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, कामगार तसेच अत्यावश्यक सेवा वाहने या पुलावरून ये-जा करतात. मात्र पूल बंद असल्यामुळे नागरिकांना आळंदीमार्गे मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत असून वेळ, पैसा व इंधनाचा अपव्यय होत आहे. यासोबतच तासन्तास वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
पूल बंदमुळे रुग्णवाहिका, अग्निशमन सेवा व इतर आपत्कालीन सेवांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे. चहोली खुर्द परिसरात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर राहील, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे. संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असून, लवकरात लवकर निर्णय न झाल्यास आंदोलन, रास्ता रोको किंवा उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, सदर पूल एक महिन्याच्या आत दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा व त्याबाबतची लेखी माहिती देण्यात यावी, अशी ठाम मागणी महापौर काळजे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.



