भारतीय स्त्री ही त्याग आणि समर्पणाची मूर्ती आहे :- साध्वी ऋतंभरा…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : “भारतात धर्मासाठी लढणारे अनेक वीर जन्माला आले. त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला जगणे शिकवले. राजमाता जिजाऊंनी शिवरायांच्या मनात संस्काराचे बीज रोवले. भारतीय स्त्री ही त्याग आणि समर्पणाची मूर्ती आहे. धैर्य हा स्त्रीकडे असलेला मोठा गुण आहे. त्यामुळे समर्पण करण्याचे सामर्थ्य स्त्रीकडे आहे.”असे प्रतिपादन साध्वी ऋतंभरा यांनी केले. गोविंददेव गिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आळंदी येथे सुरु असलेल्या गीताभक्ती अमृत महोत्सवात त्या बोलत होत्या. दरम्यान बुधवार, दि. ०७ फेब्रुवारी रोजी झालेल्या ‘मातृशक्ति सम्मलेनात’ त्यांची विशेष उपस्थिती होती. 

            “अयोध्येतील श्रीराम मंदिराचे शिखर रामसेवकांची तपस्या आहे, तिथला कलश रामसेवकांचे श्रम आहे, तिथल्या भिंती आपल्या धर्माचा अभिमान आहे, तिथला मंडप आपली तितिक्षा आहे तर मंदिरातील गर्भगृह म्हणजे ५०० वर्ष पाहिलेली प्रतिक्षा आहे. ते मंदिर केवळ दगडाचे मंदिर नसून कारसेवकांच्या बलिदानातून तयार झालेले मंदिर आहे.

               गोविंददेव गिरीजी महाराजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीरामललाचे चरणतीर्थ दिले, त्या क्षणाचा उल्लेख करत साध्वी ऋतंभरा म्हणाल्या, “पंतप्रधान मोदींनी श्रीरामललाचे चरणतीर्थ प्राशन करून आपला उपवास पूर्ण केला. गोविंददेव गिरीजी महाराजांनी ज्यापद्धतीने ते दिले, त्यावेळी सर्व देवदेवता त्यांच्या दृदयात विराजमान झाल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी त्यांच्या वाणीतून जणू माता सरस्वती बोलत होती.”

              गोविंददेव गिरीजी महाराजांनी सनातन धर्माप्रती केलेल्या कार्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “वेदांमध्ये ज्या धर्माचे मूळ, पुराणात ज्याची व्याख्या, उपनिषदांत ज्याचे चिंतन आहे, श्रीराम व श्रीकृष्णाचे जीवन ज्याची शाश्वत परिभाषा आहे; तो आपला ‘सनातन धर्म’ आपल्या पृथ्वीची आशा आहे. त्या आशेला जागृत करण्याचे कार्य गोविंददेव गिरीजी महाराजांना केले आहे.”