‘एक मूल – एक झाड ‘ संकल्पना रुजवा : – अभिनेते सयाजी शिंदे… — पर्यावरण स्नेही प्रबोधनपर साहित्याचे लोकार्पण…

 

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांसाठी आवश्यक असणाऱ्या प्रबोधनपर साहित्य निर्मिती करणाऱ्या पुणे येथिल चैत्र क्रिएशन्स अँड पब्लिसिटी संस्थेने आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून साईवाणीच्या सहकार्याने पर्यावरण विषयक प्रबोधनपर साहित्याचा लोकार्पण सोहळा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट येथे आयोजित केला होता.

         या कार्यक्रमाला सह्याद्री देवराई चे संस्थापक व अभिनेते सयाजी शिंदे व साईवाणी संस्थेचे संस्थापक ॲडव्होकेट डॉ. सुनील नानासाहेब करपे याची विशेष उपस्थिती होती.

        सध्या जगाला भेडसावत असलेल्या कार्बन उत्सर्जन, हवामान बदल, वाढते तापमान, अवकाळी पाऊस, ग्लोबल वॉर्मिंग, खालावलेली भूजल पातळी, ओला व सुका दुष्काळ अशा विविध पर्यावरणीय समस्यांबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन निर्माण करण्यासाठी चैत्र क्रिएशन्स अँड पब्लिसिटी संस्थेने सहा प्रकारच्या प्रबोधनपर साहित्याचे लोकार्पण केले.

        या कार्यक्रमात बोलताना सह्याद्री देवराईचे संस्थापक व अभिनेते श्री सयाजी शिंदे म्हणाले, ” पर्यावरण दिनी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला जातो परंतु यांचे अनुकरण किती होते हा मूळ कळीचा मुद्दा आहे, मुलांना शाळेत दाखल करताना जन्म दाखल्याची अट लागते , त्याप्रकारेच प्रत्येक मुलाने झाडाचे एक बी आणावयाची अट घातली पाहिजे. जेणेकरून तो मुलगा अथवा मुलगी आपले शालेय शिक्षण पूर्ण करेल त्यावेळी त्याच्या हक्काचे एक झाड असेल. 

     चैत्र क्रिएशन्स अँड पब्लिसिटी संस्थेच्या संस्थापक व संचालिका चित्रा मेटे यांनी या उपक्रमाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, ” प्रबोधनपर साहित्यामध्ये कृती संच, कृतीपुस्तिका, बुक कव्हर्स, लेबल्स, बुकमार्क व फिल्म्स याचा समावेश असून हे साहित्य जागतिक स्तरावर स्वीकारण्यात आलेल्या कृती शिक्षणाचे तत्व अंगीकारून तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयामध्ये पर्यावरण विषयक जाणीव विकसित करण्यासोबतच त्यांच्यामध्ये संवाद कौशल्य, स्मृती व तर्क विकास सर्जनशीलता, आत्मविश्वास, हस्तनेत्र समन्वय, निरीक्षणशक्ती, सुष्मकारक कौशल्ये या गुणांचा विकास होण्यासाठी हे प्रबोधनपर साहित्य उपयुक्त आहे.