लुमेवाडी येथे हाजी हाफीज फत्तेह मोहंमद जोधपूरी बाबांचा शुक्रवार पासून उरूस…

नीरा नरसिंहपूर, दिनांक:5

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार 

 सालाबाद प्रमाणे तीर्थक्षेत्र लुमेवाडी (ता. इंदापूर) येथील गाजी-ए-मिल्लत सूफी संत हाजी हाफीज फतेह मोहंमद जोधपुरी बाबा यांचा 30 वा उरुस शरीफ शुक्रवार (ता.6) ते रविवार (ता.8) दरम्यान होणार आहे. 

    सदरचा उरुस हजरत सूफी वली चाँदपाशा ( आवाटी), हजरत सूफी अरिफबाबा (मोमिनाबाद), हजरत यादअली साहब (छोटे बाबजी राजस्थान) यांच्या (जेरे- ए-निगरानी) मार्गदर्शनाखाली होणार आहे. शुक्रवारी काझी गल्ली (अकलूज) येथून सात वाजता संदल आणून बाबांच्या मजार शरीफवर चढवून प्रवचनाचा कार्यक्रम होईल. शनिवारी मुख्य उरसाच्या दिवशी सायंकाळी होणारा हाजी मुराद आतीष (कर्नाटक) यांचा कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. तसेच, रविवार सकाळी जियारतला गोड जर्दाचे वाटप करून उरुस संपन्न होईल. परंपरेप्रमाणे येणाऱ्या भाविकांसाठी दाळभाताचे लंगरखाना (महाप्रसाद) मुख्य उरूसच्या दिवशी हजरत फत्तेह मोहंमद जोधपुरीबाबा यंग ग्रुप व दर्गाह बांधकाम कमिटीतर्फे करण्यात आले आहे. 

    दरम्यान, दर्गाहकडे येणाऱ्या गावातील रस्त्याचे काहीचे काम केले तर बऱ्याच रस्त्याच्या दुरुस्तीकडे मागील तीस वर्षांत कोणताच प्रयत्न अथवा निधीची तरतूद करण्यात आले नसल्याबद्दल बाहेरून येणाऱ्या भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर तिर्थक्षेत्राच्या मानाने येणाऱ्या भाविकांना शौचालयाची सोयही करता आलेली नाही. तसेच पंचायत समिती व सार्वजनिक बांधकाम विभाग तिर्थक्षेत्राकडे कामाबाबत जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

फोटो : – हाजी हाफीज फत्तेह मोहंमद जोधपूरी बाबा